मुंबई: शिवसेनेने आतापर्यंत अनेक वादळं अंगावर घेतली, मात्र आता शरद पवार आमच्यासोबत आहेत, जे वादळं निर्माण करतात असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आज प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावं लागतं, हिंमत असेल तर मैदानात या, आम्ही तयार आहोत, होऊन जाऊ दे काय ते असं आव्हान त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिलं. शिवसेनेचा जन्मच लढण्यासाठी झाला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेना धक्काप्रुफ झाली आहे. रोज आम्हाला धक्के बसतात, पण आम्ही त्याला तोंड देतोय. मी आता मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही यावर लक्ष देण्यापेक्षा एकत्र या मैदानात, आम्ही तयार आहोत असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिलं आहे."
भुजबळ शिवसेनेत असते तर आधीच मुख्यमंत्री झाले असते
उद्धव ठाकरे म्हणाले की, "चार महिने अजून सत्ता असती तर छगन भुजबळ हे मुख्यमंत्री झाले असते असं अजित पवार म्हणाले. पण मी सांगतो की छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते या आधीच मुख्यमंत्री झाले असते."
उद्धव ठाकरे म्हणाले की, "भुजबळांनी शिवसेना सोडली हा आमच्यासाठी सर्वात मोठा धक्का बसला होता. त्यामुळे आम्हाला सावरायला खूप वेळ लागला. एक चांगली गोष्ट भुजबळांनी केली ती म्हणजे बाळासाहेब असतानाच त्यांनी हे मतभेद मिटवले. त्यावेळी मॉं असत्या तर अजून चांगलं झालं असतं."
भुजबळ जाताना एकटे गेले, येताना काँग्रेस-राष्ट्रवादीला आणलं
छगन भुजबळ यांच्याबद्दल जुन्या आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भुजबळ यांनी शिवसेना सोडताना एकटे गेले. पण नंतर महाविकास आघाडीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला सोबत आणलं.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने षण्मुखानंद सभागृहात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अजित पवार, फारुख अब्दु्ल्ला, गीतकार जावेद अख्तर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. पण काही कारणांमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.