मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं अभिनंदन केलं आहे. एकीकडे विरोधी पक्षांकडून वाल्मिक कराड यांना पोलिसांकडून अटक होण्याऐवजी ते शरण आल्यानं पोलिसांवर आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकरांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे.
मिलिंद नार्वेकरांच्या एक्स पोस्टमध्ये नेमकं काय?
"मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला जी यांचे अभिनंदन!'
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड यांना पत्रकारांनी मिलिंद नार्वेकरांच्या भूमिके संदर्भात प्रश्न विचारलं असता त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. मिलिंद नार्वेकर हे स्वतंत्र व्यक्ती आहेत. ते असे बोलू शकतात ते मोठे आहेत, मी इतका मोठा नाही. ते मोठ्या मनाचे आहेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खर की काय म्हणत मिलिंद नार्वेकरांच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे.
वाल्मिक कराड यांना घेऊन सीआयडीचं पथक केजच्या दिशेनं
वाल्मिक कराड बीडमधील केज येथील अवादा कंपनीला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात शरण आले. सीआयडीच्या पथकाकडून त्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना केजला नेण्यात आलं आहे. वाल्मिक कराड यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून खंडणी प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ते फरार झाले होते. आज ते पुण्यात सीआयडीसमोर हजर झाले.
वाल्मिक कराड यांनी सीआयडीसमोर शरण येण्यापूर्वी एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओत त्यांनी मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे, पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी, असं म्हटलं आहे.
इतर बातम्या :
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य