पुणे : बीडमधील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील आरोपी व मास्टरमाईंड असल्याचा आरोप ज्याच्यावर आहे, त्या वाल्मिक कराडने अखेर शरणागती पत्कारली आहे. वाल्मिक कराड आपल्या खासगी कारमधून पुणे सीआयडी कार्यालयात दाखल झाला. एखाद्या चित्रपटातील दृश्य असल्यासारखे असून पोलिसांना शरण येण्यापूर्वीच वाल्मिक कराडने (Walmik Karad) एका व्हिडिओच्या माध्यमातून स्वत:ची बाजू मांडली होती. त्यामध्ये, संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी माझा संबंध नसून राजकीय हेतुने मला अकडवण्याचा डाव असल्याचंही कराडने म्हटले होते. आता, वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर विरोधक आक्रमक झाले असून वाल्मिक कराडला शरण यायला कोणी सांगितलेल, कुणाच्या सांगण्यावरुन तो शरण आला असा सवाल उपस्थित होत आहे. माजी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) छत्रपतींनी देखील मंत्री धनजंय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर शंका उपस्थित केली आहे.
संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बीड मध्ये मोर्चा झाला. सीआयडी पोलिसांचे हे यश नाही, थोडं फार सरकारवर जे आम्ही दबाव टाकला होता, त्यातूनच वाल्मिक कराडवर हा मानसिक दबाव आला असेल. आरोपी वाल्मिक कराड 22 दिवस बिनधास्तपणे महाराष्ट्रात फिरतो, अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतो, पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल होतो. काल धनंजय मुंडे फडणवीस यांना भेटतात आणि आज वाल्मीक कराड हजर होतो हा संशोधनाचा भाग आहे, असे म्हणत धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुनच वाल्मिक कराड शरण आल्याचे संभजीराजेंनी म्हटलं आहे. वाल्मिकला धनंजय मुंडेंचा आश्रय आहे. खंडणीच्य गुन्ह्यातून त्याला जामीन मिळेल, पण खूनाच्या गुन्ह्याचं काय, हा असला खेळ खंडोबा नको असे म्हणत वाल्मिक कराडला खुनातील आरोपी करण्याची मागणी देखील संभाजीराजेंनी केली आहे.
वाल्मीक कराड 7 आरोपींचा म्होरक्या आहे, त्याच्या नावाने 14 गुन्हे आहेत आणि तरी सुद्धा बॉडी गार्ड घेऊन फिरतो. वाल्मिक कराडला केवळ खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अद्यापही खूनाचा गुन्हा दाखल नाही. मात्र, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, वाल्मीक कराडवर मोक्का देखील लागणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री यांनी आता वाल्मीक कराड याच्यावर मोक्का लावणार का याबद्दल स्पष्टीकरण द्यावं, असेही संभाजीराजेंनी म्हटले. माझी मुख्यमंत्री यांना विनंती आहे की, धनंजय मुंडे यांना तर पालकमंत्री पद मुळीच देऊ नका, याशिवाय त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणीही संभाजीराजेंनी केली आहे.
अजित पवारांनाही सवाल
संभाजीराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेवरही शंका व्यक्त केली आहे. अजित पवारांना सुद्धा विचारायचे आहे की याविषयी तुम्ही एकदाही का बोलला नाहीत. केवळ सांत्वनपर भेट घेऊन उपयोग नाही, तुम्ही देखील याप्रकरणावर बोललं पाहिजे, धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचं काम कोणीही करु नये, असे संभाजीराजेंनी म्हटले. वाल्मीक कराडला मोक्का लावल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्प राहणार नाही. काल चर्चा आणि आज सरेंडर झाला. धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मीक कराडला काही निरोप आला का?, असा सवालही संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे. दरम्यान,वाल्मिक कराड शरण आला तरी त्याला नेमकं कोणत्या गुन्ह्यात अटक करण्यात आली हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केले नाही. त्यामुळे, अटकेनंतर वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात जामीन देखील मिळू शकतो, असे अनेकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती गाडी कोणाची?