मुंबई : येत्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता आहे, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पवारांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी नेत्यांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, पवारांनी तयारीला लागण्याची सूचना केली.

राष्ट्रवादीचा काँग्रेसला समान जागांचा प्रस्ताव
राष्ट्रवादीने येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 50-50 टक्के जागांचा प्रस्ताव काँग्रेसला दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकांच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याचं समोर आलं आहे.

2014 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे चार खासदार तर काँग्रेसचे दोन खासदार निवडून आले. विधानसभेत काँग्रेसचे 42 आमदार तर राष्ट्रवादी 41 आमदार आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद समान ताकद आहे, असं सांगत जागा वाटप समान म्हणजे 50-50 टक्के व्हावं असा प्रस्ताव शरद पवार यांनी राहुल गांधींना दिल्याचं समजत आहे.