मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने लक्ष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने या घोटाळ्याचा अहवालच शिवसेनेने आज प्रसिद्ध केला आहे.
शिवसेना आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. त्यासाठी शिवसेनेने नंदलाल समितीचाही आधार घेतला आहे. 27 फेब्रुवारी 2001 चा अहवाल आहे.
अनिल पबर म्हणाले की, "मुंबई महापालिकेत भाजपला पारदर्शकता हवी आहे. यासाठी शिवसेनेवर बेच्छूट आरोप केले जात आहेत. याला उत्तर म्हणून नागपूर महापालिकेतील माहिती जनतेसमोर ठेवणार आहोत. नंदलाल समितीने नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचारावर अहवाल सादर केला होता. त्यावेळचे महापौर आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशी अनियमितता केली याचे पुरावे या अहवालात आहेत."
नंदलाल समितीचा अहवाल
- देवेंद्र फडणवीस महापौर असताना स्थायी समितीच्या सदस्यांनी कंत्राटदारासोबत परस्पर वाटाघाटी केल्या
- निविदा न मागवताच काही ठराविक कंत्राटदारांना कामं देण्यात आली
- या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर नगरसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले
- अहवालात महापौरांच्या कारभारावर ठपका ठेवण्यात आला, गुन्हे दाखल करण्याची शिफारसही होती
- राजीव घोल्लार, कल्पना पांडे, वसुंधरा मसुरकर आणि देवेंद्र फडणवीस या 4 महापौरांच्या काळात हा भ्रष्टाचार झाला
- या काळात 15 महिन्यात नागपुरात एकही सर्वसाधारण सभा झाली नाही
मुंबई महापालिकेतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी SIT नेमली आहे. पण एसआयटीच्या चौकशीत एकाही शिवसेना नेत्याचं नाव आलेलं नाही. जे मुख्यमंत्री आज माझ्याकडे बघून विश्वासाने मत द्या, असं म्हणतात त्यांच्या महापौर असतानाच्या कार्यकाळात नागपूर महापालिकेत मोठे भ्रष्टाचार झाले आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला.