मुंबई: एवढी वर्षे मुबई महापालिकेची सत्ता असताना यांनी मुंबईकरांना काय दिलंय असा सवाल विचारत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यांचे घोटाळे आता बाहेर येत आहेत, त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता मोर्चा काढला असाही आरोप त्यानी केला. 


मुंबई महापालिकेच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज बीएमसीवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, "यांनी कोविडचा घोटाळा केला, अनेक घोटाळे आता बाहेर येत आहेत. एवढी वर्ष सत्ता असताना मुंबईकरांना यांनी काय दिलंय. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय. भ्रष्टाचार कुठला झालाय त्याची माहिती तरी द्या."


आजचा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; एकनाथ शिंदे यांचा आरोप


आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चावर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोविड सेंटरच्या नावाखाली करण्यात आलेल्या गैरव्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरु झाल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोर्चा काढला जात आहे. मात्र जनता त्यांच्या या भूलथापांना फसणार नाही. आज काढण्यात आलेल्या मोर्चाचे ठिकाण चुकले आहे. खरा मोर्चा मातोश्री 1 ते मातोश्री 2 दरम्यान काढण्याची खरी गरज होती. कारण जो काही गैरव्यवहार झाला आहे तो याच ठिकाणी झाला आहे.


समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथील अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्याने संवेदनशील असल्याने भाजपने मोर्चा रद्द केला. मात्र कोणतीही संवेदना न उरलेल्या व केवळ राजकारण करणाऱ्यांनी मोर्चा काढला, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. आजचा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. कोविड सेंटर लोकांना जगवण्यासाठी बनवली होती की मारण्यासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगस कोविड सेंटर, बोगस डॉक्टर, बोगस ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आले. सदोष ऑक्सिजन प्रकल्पामुळे रुग्णांना ब्लॅक फंगस आजार झाला. एवढेच नव्हे मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनी कोविड काळातील मृत व्यक्तींचे मृतदेह नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडीबॅगसाठी सहाशे रुपयांऐवजी तब्बल साडे सहा हजार रुपये खर्च केले. आम्ही ठाण्यात तीच बॅग अवघ्या 325 रुपयात घेतली. काहीजण ठाण्यातील व्यवहारांची चौकशी लावण्याची चर्चा करत आहेत. मात्र कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याने बिनधास्त चौकशी लावा, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले. ठाण्यात कोविड कालावधीत आम्ही 1200 बेडचे रुग्णालय महापालिकेच्या निधीशिवाय उभारले, मोफत रेमडेसिवीर वाटले, असे मुख्यमंत्री म्हणाले.  
  
एकनाथ शिंदे म्हणाले की, "महापालिकेत झालेल्या गैरव्यवहारांबाबत ईडी चौकशी करत आहे, ही चौकशी आम्ही लावली नाही, मात्र चौकशी सुरु झाल्याने घाबरलेल्या विरोधकांनी आमच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. मुंबईत सिमेंट क्रॉंकिटचे रस्ते 20 वर्षापूर्वी करायची गरज होती, तर महापालिकेचे साडेतीन हजार कोटी रुपये वाचले असते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवसेना भाजपचे युती सरकार राज्यात आल्यावर आम्ही विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे विरोधकांना पोटदुखी झाली आहे, ती पोटदुखी पळवण्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला आहे."