Marmik Formation Day : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Balasaheb Thackeray) यांनी मार्मिकच्या (Marmik) माध्यमातून मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडली. कुंचल्याच्या फटकाऱ्यांमधून त्यांनी विरोधक आणि तत्कालीन सरकारला जेरीस आणलं. त्याच मार्मिकचा आज 62वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Live) शिवसैनिकांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार आहेत. एकनाथ शिंदे आणि समर्थक शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर होणाऱ्या मार्मिकच्या वर्धापनदिनाला विशेष महत्त्व आहे. त्यातच शिंदे गटाकडून मुंबईतील दादरमध्ये जिथं शिवसेनाभवन आहे तिथेच प्रतिशिवसेनाभवन उभारण्याच्या हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडं साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. 


तसंच आगामी मुंबई पालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी आमिषाला बळी पडू नका आणि कामाला लागा असा सल्ला दिला आहे. आज होणाऱ्या मार्मिकच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे.. पालिका निवडणुकांसह सध्याची राजकीय परिस्थिती, ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया आणि भाजपबाबत काय बोलणार याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार आणि राजकारणाला कोणती दिशा देणार याकडे शिवसैनिकांसह महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहे.


खातेवाटपावरून सामनातून शिंदे सरकारवर टीका
दरम्यान दुसरीकडे आज खातेवाटपावरून सामनातून शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे. बिनचेहऱ्यांचे आणि बिनखात्याचे नामुष्की सरकार अशा शब्दात सामनातून निशाणा साधला आहे. सामनात म्हटलं आहे की, शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पाळणा 40 दिवसांनंतर हलला खरा, पण आता त्याचे खातेवाटप लटकले आहे. मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन दिवस उलटले आहेत. देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन तोंडावर आला आहे; पण राज्याच्या मंत्रिमंडळाचे ना खातेवाटप झाले आहे ना जिल्हय़ा-जिल्हय़ांचे पालकमंत्री ठरले आहेत. आधी मंत्रिमंडळ विस्ताराला 40 दिवस लागले; आता त्यातील खातेवाटपासाठीही घोळात घोळ सुरू आहे. 40 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा पाळणा हलला तेव्हा या पाळण्याची दोरी नेमकी कोणाकडे आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. मात्र या पाळण्याला अनेक दोऱ्या आहेत आणि त्या आतल्या-बाहेरच्या अशा अनेकांच्या हातात आहेत असे दिसत आहे. जे पाळण्यात आहेत ते त्यांना हव्या असलेल्या खात्यांसाठी, तर ज्यांना पाळण्यात जागा मिळालेली नाही ते नाराजी व्यक्त करण्यासाठी हातातील दोरीचा 'झटका' देत आहेत. शिंदे गटाला समर्थन देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही दोन दिवसांपूर्वी असाच झटका दिला होता. बच्चू कडू हे ज्येष्ठ अपक्ष आमदार आहेत. आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्येही ते मंत्री होते. मात्र शिंदे गटाने बंडखोरी केली तेव्हा त्यांना सुरुवातीपासून साथ देणाऱ्या अपक्ष आमदारांत ते अग्रेसर राहिले. त्यामुळे नव्या सरकारच्या पहिल्या पाळण्यात आपल्यालाही जागा मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही. त्यामुळे ते नाराज झाले, असं लेखात म्हटलं आहे.