मुंबई : माझगांव आणि डोंगरी या भागांना जोडणाऱ्या हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीतील महत्त्वाचा टप्पा असलेला दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 6 जून 2021 रोजी पूर्ण करण्यात आले. हा आव्हानात्मक आणि महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने या पुलाच्या पुनर्बांधणीला आणखी वेग येणार आहे. 


मुंबईतील माझगांव आणि डोंगरी यांना जोडणारा हँकॉक पूल सन – 2016 मध्ये मध्य रेल्वेने तोडला. या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाने उप आयुक्त (पायाभूत सुविधा) तथा प्रमुख अभियंता (रस्ते व पूल) श्री. राजेंद्रकुमार तळकर आणि त्यांचे सहकारी, अधिकारी हे या पुलाच्या पुनर्बांधणीची कार्यवाही करीत आहेत.


हँकॉक पुलाच्या बांधणीतील पहिल्या टप्प्यात पहिला गर्डर जुलै 2020 मध्ये स्थापन करण्यात आला आणि त्यावरील पदपथ जानेवारी 2021 मध्ये सर्वसामान्यांच्या वापरासाठी खुला करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातील सुमारे 675 मेट्रिक टन वजनाचा गर्डर रविवार दिनांक 6 जून 2021 रोजी पूर्ण करण्यात आले. महानगरपालिका आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून हे आव्हानात्मक काम पूर्ण केले.


मुंबईच्या मधोमध विस्तीर्ण जंगल फुलवण्याचा मार्ग मोकळा, आरेकडून वन विभागास मिळाला 812 एकर जागेचा ताबा


दुसरा गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने पुलाची पुनर्बांधणी आणखी जलद गतीने करता येणार आहे. या पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम, उपलब्ध रस्त्याची रुंदी तसेच आवश्यक रुंदीकरण आणि बाधित कामांचे निष्कासन यासापेक्ष लवकरच हाती घेतले जाणार आहे.