मुंबई : काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता शिवसेनेनेही स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. 12 जुलैपासून राज्यभरात शिवसंपर्क मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी केली जाणार आहे. 'शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2022' असं या मोहिमेच नाव असणार आहे. या मोहिमेत प्रत्येक मतदार संघातून प्रश्नावली भरून घेतली जाणार आहे. आणि प्रत्येक निवडणुकीची रननिती ठरवली जाणार आहे.


येत्या वर्षभरात 20 महानगरपालिका, 27 जिल्हा परिषद आणि 300 नगरपालिका तसेच 325 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्याचीच तयारी आणि डेटा बेस अभ्यास करण्यासाठी शिव संपर्क मोहीम शिवसेनेने 12 जुलै ते 24 जुलैपर्यंत सुरू करणार आहे. ही फक्त मोहीमच नाही तर प्रत्येक मतदारसंघात जाऊन बारीक निरीक्षण माहिती जमा केली जाणार आहे. प्रत्येक विभागातून एक प्रश्नावली भरून घेतली जाणार आहे. त्यानंतर ती शिवसेना भवन या ठिकाणी जमा केली जाणार आहे.


आगामी निवडणुकीसाठी माहिती भरून घेण्यासाठी प्रश्नावली



  • संबंधित निवडणूक जिंकण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे?

  • मतदार संघात असलेल्या समस्या

  • महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय परिस्थिती विभागात कोणत्या पक्षाची ताकद आहे.

  • महापालिका/नगरपालिका/नगरपरिषद विभागात येणाऱ्या विभागाचा अहवाल



शिवसंपर्क मोहीम कशी असणार?


प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये बैठक आयोजित केली जाणार. या बैठकीला जिल्हाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुख उपस्थित असणार.
या दौऱ्या संदर्भात जिल्हाप्रमुख यांनी 10 जुलैपर्यंत शिवसेना भवन येथे माहिती देणे अपेक्षित आहे.
संपूर्ण दौऱ्याचा अहवाल विधानसभा मतदार संघनिहाय एकाच पुस्तकात बंदिस्त असावा. एक प्रत शिवसेना भवन या ठिकाणी पाठवावी तर दुसरी प्रत स्वतःकडे ठेवावी.


अहवालात काय असणार?



  • ज्या गावांमध्ये शिवसेना शाखा नाही, त्या गावात शिवसेना शाखा कधी स्थापन केली जाणार?

  • प्रत्येक गावातील प्रभागनिहाय शाखा प्रमुख, शाखा संघटिका, युवा सेना शाखा संघटक यांची नावे व दूरध्वनी क्रमांक असावा.

  • गावात किती शिवसैनिकांची नोंदणी झाली आहे?

  • 2022 च्या निवडणुका समोर असताना नवीन मतदार नोंदणी यात आले आहेत का?

  • विभागात कार्यरत असलेल्या सर्व शिवसैनिकांची यादी व संपर्क क्रमांक


विधानसभा निवडणुकीला जरी वेळ असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत शिवसेनेने रंगीत तालीम सुरू केलीय. त्यामुळे राज्यात युती-आघाडी वरती अवलंबून न राहता स्वबळावर तयारी करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षीय समीकरण पाहणं महत्वाचं ठरणार आहे.