मुंबई: भाजपच्या पाक्षिकातून काल सेनेवर जोरदार टीका केल्यानंतर सामनातून त्याला उत्तर मिळणं अपेक्षित होतं. मात्र, आज सामनामधून माधव भंडारींवर नाही तर सुब्रमण्यम स्वामी आणि जेटलीवर टीका करण्यात करण्यात आली आहे.
'डॉ. स्वामी हे शिवसेनेचे नाहीत, अरुण जेटलीही नाहीत. त्यामुळे ज्या सत्तेत बसता त्या सत्तेविरोधात का बोलता? हे शहाणपण निदान शिवसेनेला कुणी शिकवू नये. सत्य हे शेवटी सत्यच असते. सत्ताधारी पक्षातले जेटली आणि स्वामी यांनी त्यांचे मनोगत मांडले आहे. लोकशाहीत हे घडायचेच.' असं सामनातून म्हटलं आहे.
गेल्या दोन दिवसांआधी स्वामींनी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम हे काँग्रेसधार्मिणे असून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जेटलींनी अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर विश्वास असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं सरकारमधले मतभेद चव्हाट्यावर आल्याचं सामनातून म्हटलं आहे.
एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:
सत्य असे आहे!
केंद्र सरकारला आम्ही उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य चिंतित आहोत. मोदी सरकारवरील इडापीडा टळून त्यांचे सुखाचे राज्य असेच चालत राहो, अशी आमची मनोमन इच्छा आहे. मोदींचे सरकार ही जनतेची शेवटची आशा असून तेथे काही दगाफटका झाला तर जनतेचा राजकीय नेतृत्वावरचा विश्वासच उडून जाईल व त्याची जबर किंमत देशाला मोजावी लागेल, अशी भीती आम्हास वाटण्यामागे काही घडामोडी व कारणे आहेत. शिवसेना महाराष्ट्रात व केंद्रातील सत्तेत असतानाही सरकारविरोधात भूमिका घेत असल्याची टीका होत असते व हे असे वागणे शिवसेनेला शोभते काय? असे प्रश्न भाजप मित्रवर्यांकडून विचारले जातात तेव्हा विनोदबुद्धीस टाळी देण्याचा मोह आवरत नाही.
आपण सत्तेत आहोत याचे भान ठेवा असे सल्लेही दिले जातात; पण सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम व डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यात जो आर्थिक कलगीतुरा रंगला आहे त्याच्याशी शिवसेनेचा काडीमात्र संबंध नसल्याचे आम्ही आजच जाहीर करीत आहोत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर डॉ. स्वामी यांनी तोंडसुख घेतले व रघुराम यांना काहीच कळत नसल्याने त्यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी स्वामी यांनी केली.
आता स्वामी यांनी त्यांच्या तोफखान्याची दिशा पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्या दिशेने वळवून हाहाकार माजवला आहे. सुब्रमण्यम यांची आर्थिक धोरणे देशाला मारक आहेत व हे महाशय काँग्रेसधार्जिणे असल्याचा आरोप डॉ. स्वामी यांनी केला आहे. ज्या व्यक्ती सरकारच्या कामावर परिणाम करू शकतात, सरकारची धोरणे अपयशी ठरवू शकतात, त्यांना त्या पदावरून काढले पाहिजे, असे डॉ. स्वामी यांनी अरविंद सुब्रमण्यम यांच्याबाबतीत म्हटले आहे व ते गंभीर आहे; पण स्वामी यांची विधाने अर्थमंत्री जेटली यांनी उडवून लावली आहेत. अरविंद सुब्रमण्यम यांना हटवले जाणार नाही व ते मोदी सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याची भूमिका अर्थमंत्र्यांनी मांडली आहे. वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनीही स्वामी यांना विरोध करून अरविंद सुब्रमण्यम यांची बाजू घेतली आहे. जेटली व डॉ. स्वामी हे एकाच पक्षाचे आहेत व दोघांतील वादामुळे सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. डॉ. स्वामी यांच्याविषयी आम्हाला ममत्व आहे, कारण हिंदुत्वनिष्ठा व त्यांची भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांना तर झोपेतही डॉ. स्वामीच दिसत असावेत इतकी त्यांची दहशत आहे. स्पेक्ट्रम तसेच ‘नॅशनल हेरॉल्ड’सह अनेक घोटाळे डॉ.स्वामी यांनी लावून धरल्यामुळेच सत्य चव्हाट्यावर आले व तेव्हा भाजपने त्यांचा चांगलाच वापर केला. त्यामुळे स्वामी हे आता त्यांच्या पद्धतीने एखादे सत्य सांगत असतील तर ते त्यांचे वैयक्तिक मत ठरवून गुंडाळता येणार नाही.
डॉ. स्वामी यांची निवड राज्यसभेवर राष्ट्रपतींनी केली ती अर्थतज्ज्ञ म्हणून व ते भाजपचे जुनेजाणते शिलेदार आहेत हे नाकारता येणार नाही. म्हणूनच स्वामी, जेटली, रघुराम व अरविंद सुब्रमण्यम यांच्यातील पिपाण्या व रणशिंगे म्हणजे भाजपातील अंतर्गत कलह असावेत. जेटली यांना अर्थमंत्रीपदावरून हटवून तेथे डॉ. स्वामी यांना नेमायचे आहे, अशी पुडी काँग्रेसच्या दिग्विजय सिंगांनी सोडली. हा मूर्खपणाच आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा, पाकिस्तान, कश्मीरच्या प्रश्नांवर शिवसेना राष्ट्रहितासाठी म्हणून भूमिका घेते तेव्हा नाके मुरडणारे स्वपक्षातील कलगीतुर्यांवर ‘मौन’ धारण करतात. डॉ. स्वामी हे शिवसेनेचे नाहीत. अरुण जेटलीही नाहीत. त्यामुळे ‘ज्या सत्तेत बसता त्या सत्तेविरोधात का बोलता?’ हे शहाणपण निदान शिवसेनेला कुणी शिकवू नये. सत्य हे शेवटी सत्यच असते. सत्ताधारी पक्षातले जेटली व स्वामी यांनी त्यांचे मनोगत मांडले आहे. लोकशाहीत हे घडायचेच.