संजय राऊत यांचे 'रोखठोक' प्रश्न, मुख्यमंत्री देणार उत्तरं
एबीपी माझा वेब टीम | 10 Apr 2018 08:49 AM (IST)
मुंबईत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात दुपारी चार वाजता ही मुलाखत होणार आहे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची घेतलेली मुलाखत ताजी असतानाच आणखी एक राजकीय मुलाखत महाराष्ट्राच्या राजकारणात रंगणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नांना चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामोरे जाणार आहेत. मुंबईत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात दुपारी चार वाजता ही मुलाखत होणार आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, रेल्वे मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री कतरीना कैफ आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत आतापर्यंत शिवसेनेचा किल्ला लढवत भाजपशी अटीतटीची लढाई करत आले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून अनेकदा मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली जाते, मात्र यानिमित्ताने शिवसेना-भाजपमध्ये वेगळाच 'सामना' रंगणार आहे.