मुंबई: राज्याचं नवं गृहंनिर्माण धोरण आणि जीएसटी विधेयकासंदर्भात मातोश्री निवास्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे सर्व कॅबिनेट मंत्री, आमदार उपस्थित होते. विशेष म्हणजे राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण कसं असावं, यावर सखोल करण्यासाठी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हेही या बैठकीला उपस्थित होते.
येत्या 2 किंवा 3 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र हे नवं गृहनिर्माण धोरण जाहीर करणार असल्याची शक्यता सुत्रांनी दिली आहे.
फेब्रवारी 2017 ला राज्यात 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच हे नवं गृहनिर्माण धोरण जाहीर होणार आहे. याचा परीणाम सर्वाधिक मुंबई महापालिका क्षेत्रातील गृहनिर्माण प्रकल्पांवर होणार आहे. राज्यातील इतरही महापालिक क्षेत्रातील गृहनिर्माण बांधकामावर या धोरणाचा परीणाम होणार आहे.
याशिवाय येत्या 29 ऑगस्ट रोजी राज्याचं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात बहुचर्चित GST विधेयकावर चर्चा होणार आहे. त्यामुळे GST विधेयकावरही शिवसेना आमदार आणि पक्षप्रमुखांमध्ये चर्चा झाली.
शिवसेनेनं यापूर्वीच GST विधेयकातील काही मुद्दांना विरोध केला होता. यानंतर केंद्र सरकारने या विधेयकात सुधारणा करून लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर करून घेतले. आता या विधेयकाला इतर राज्याकडूनही मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29 ऑगस्ट रोजी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. तेव्हा सुधारित GST विधेयकाला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठिंबा द्यायचा का? यावर विशेष चर्चा झाल्याचे समजते.