मुंबई : आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांच्या तक्रारीनंतर गायक अभिजीत भट्टाचार्यला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची जामीनावर सुटकही केली. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली.


 

प्रीती मेनन यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली.

https://twitter.com/PreetiSMenon/status/769112613863186437

 

ट्विटरवर अपशब्द वापरल्याविरोधात प्रीती शर्मा मेनन यांनी 26 जुलै रोजी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली होती. तसंच अभिजीतचे आक्षेपार्ह ट्वीट डिलीट करावे किंवा त्याचं अकाऊंट बंद करावं, अशी मागणी मुंबई पोलिसांनी ट्विटरकडे केल्याचं प्रीती मेनन यांनी सांगितलं.

https://twitter.com/PreetiSMenon/status/769112613863186437

काय आहे प्रकरण?

 

अभिजीतने पत्रकार स्वाती चतुर्वेदी आणि जनता का रिपोर्टर डॉट कॉमचे मुख्य संपादक रिफात जावेद यांच्याविरोधात वादग्रस्त ट्वीट केलं होतं. चेन्नईतील इंजिनिअर तरुणाच्या हत्येमधील आरोपी मुस्लिम असल्याचा दावा अभिजीतने ट्वीटमध्ये केला होता. त्यानंतर अभिजीत समाजात धार्मिक तेढ निर्माण करुन कायदा-सुव्यवस्थेत अडथळा आणत असल्याचं ट्वीट स्वाती चतुर्वेदी यांनी केलं होतं. यावेळी स्वाती यांनी मुंबई पोलिसांनाही मेन्शन करत अभिजीतवर कारवाईची मागणी केली होती. पण यानंतर अभिजीतने स्वाती चर्तर्वेदींविरोधात अश्लील शब्द वापरुन गरळ ओकली होती.

 

यानंतर आप नेत्या प्रीती मेनन यांनी अभिजीतविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. याची दखल घेत पोलिसांनी अभिजीतविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर आज त्याला अटक करण्यात आली. परंतु त्यानंतर तातडीने जामीन मिळाल्याने त्याची सुटकाही झाली.