मुंबई : शिवसेनेचे आमदार आणि मंत्री यांच्यामधील वाद काही नवीन नाही. पण आता या वादाला जाहीरपणे तोंड फुटलं आहे. शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी थेट आपल्याच पक्षातील मंत्र्यांवर टीका केली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांकडून कामं होत नाहीत. असा घरचा आहेर आज काते यांनी दिला.
‘मी आज शिवसेनेमध्ये नाराज आहे पण पक्ष सोडणार नाही.’ असं स्पष्टीकरणही यावेळी कातेंनी दिलं. काते हे चेंबूर अणुशक्ती नगर येथील शिवसेनेचे आमदार आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांचा पराभव केला होता.
‘सत्तेत असून आमची कामं होत नसतील तर हे दुःख आहे. मंत्र्यांच्या केबिनमध्ये जायला मी घाबरतो. काय बोलतील आणि काय नाही सांगू शकत नाही.’ अशा शब्दात आमदार काते यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
‘मंत्री कामं करत नसल्याने शिवसेनेचे नुकसान होत आहे, जर कामंच होत नसतील तर मी आमदारकीचा राजीनामा देईल.’ अशी आक्रमक भूमिकाही आता काते यांनी घेतली.
काते यांच्या या आरोपांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आमदार तुकाराम काते यांचे नेमके आरोप काय :
- महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न पालिका सोडवत नाही
- फ्री वे तयार करताना दोन हजार लोकं बेघर झाली, त्यांना अद्यापही घरं मिळालेली नाही.
- जर बीएमसी कर्मचाऱ्यांना घराबाहेर काढले तर मी दुसऱ्या दिवशी आमदारकीचा राजीनामा देईन