परिचारकांना बडतर्फ करा, अन्यथा सभागृह चालूच देणार नाही : विरोधक
एबीपी माझा वेब टीम | 07 Mar 2017 01:17 PM (IST)
मुंबई : सैनिकांच्या पत्नींचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबद्दल आमदार प्रशांत परिचारकांची आमदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. प्रशांत परिचारक यांची आमदारकी रद्द झाली नाही, तर सभागृह चालूच देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. आज विधानपरिषदेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रशांत परिचारक यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज ठप्प झालं आहे. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही विधानपरिषदेत आमदार प्रशांत परिचारक यांना तात्काळ निलंबित करावं, अशी मागणी भाजप वगळता सर्वपक्षीय आमदारांनी केली. महिला आयोगासमोर बिनशर्त माफी तर आमदार प्रशांत परिचारक यांनी वकिलाच्या माध्यमातून महिला आयोगासमोर बिनशर्त माफी मागितली आणि भविष्यात असं पुन्हा होणार नाही, असं आश्वासन दिलं. काय आहे प्रकरण? सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला होता. “पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो.” असं वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.