मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेवरुन भाजप आणि शिवसेनेत आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला इतरही पर्याय उपलब्ध आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी राऊतांनी शरद पवारांचं तोंडभरुन कौतुक केलं. महाराष्ट्रात कुणी दुष्यंत नाही, ज्याचे वडील जेलमध्ये नाहीत, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.


शिवसेना युती धर्माचं पालन करत आहे. जर कुणी युती धर्म पाळत नसेल तर ती त्यांची चूक आहे. आमच्याकडे इतर पर्यायही उपलब्ध आहेत. आम्ही योग्य नीतीवर काम करतो. सत्तेसाठी आम्ही भुकेले नाहीत. आमच्याकडे इतरही पर्याय उपलब्ध आहेत, मात्र सत्तेसाठी लोकशाहीची हत्या आम्ही करणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं.


पुढे संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात कुणी दुष्यंत नाहीस ज्याचे वडील जेलमध्ये आहेत. याठिकाणी नीती, धर्म आणि सत्याच्या गोष्टी आम्ही करतो. येथे शरद पवार आहेत, ज्यांनी भाजपविरोधात उभं राहून निवडणूक लढवली. याठिकाणी काँग्रेस आहे ज्यांच्याकडे एक आकडा आहे, जो कधीही भाजपसोबत जाणार नाही. महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण गुंतागुंतीचं बनलं आहे.





VIDEO | निकालाचे आकडे बदलले, शिवसेना नेत्यांची भाषाही बदलली | स्पेशल रिपोर्ट



हरियाणामध्ये दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीच्या मदतीने भाजपचे मनोहरलाल खट्टर पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले आहेत. जेजेपीने एकीकडे भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आणि लगेचच दुष्यंत यांच्या वडिलांना 14 दिवसांचा जामीन मिळाला. शिक्षण भरती घोटाळा प्रकरणी दुष्यंत यांचे वडील अजय चौटाला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.


राज्यातही कोणत्या एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. मात्र शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी सत्तास्थापनेवरुन दोन्ही पक्षांमध्ये तू-तू मैं-मैं सुरु आहे. भाजप 105 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यानंतर शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेसने 44 जागा जिंकल्या आहेत. सर्वात मोठा पक्ष असला तरी भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करु शकत नाही. त्यामुळे हीच संधी साधत शिवसेनेने भाजपला युतीच्या फॉर्म्युल्याची आठवण करुन देत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे. मात्र भाजपला शिवसेनेची मागणी मान्य नाही.


संबंधित बातम्या