मुंबई : भिवंडी-वाडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अपघातांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच या अपघातात अनेकांना आपले जीव देखील गमवावा लागत आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनसाठी घरी जात असताना एका दुचाकीस्वाराचा अंबाडी नाक्यावरील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळून दुर्दैवी मृत्यू झाला.

राजेंद्र डोंगरे वय 42 वर्ष हे भिवंडी तालुक्यातील बोरपाडा या गावात राहत होते. मात्र दिवाळी आपल्या मूळ गावी शेगदा वाडा येथे साजरी करावी याकरता दिवाळीच्या दिवशी पूजेचे साहित्य घेऊन आपल्या दुचाकीवरून आपल्या घरी जात होते. घरी जात असताना त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

याच महिन्यात नेहा शेख नामक डॉक्टर तरुणीचाही मृत्यू झाला होता. मात्र तरीदेखील प्रशासनाचे डोळे काही उघडताना दिसत नाही या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेत त्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या तरुणांनी आंदोलन केले, टोल नाका बंद केला तरीदेखील प्रशासन या रस्त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. कासवाच्या गतीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे मात्र प्रशासनाला अजून किती बळी घ्यायचा आहे? असा सवाल नागरिक करीत आहेत.