Navneet Rana And Ravi Rana : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यापुढे जामीन आणि घर असं दुहेरी आव्हान आहे. राणा दाम्पत्याच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. मुंबई सत्र न्यायालय राणांच्या जामीन अर्जावर आज निकाल देणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्यानं हनुमान चालिसा पठण करण्याची मागणी केली. त्यानंतर राजकीय नाट्य घडलं आणि 23 एप्रिलला राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. तेव्हापासून राजद्रोहाच्या आरोपाखाली राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालय आज निकाल देणार आहे. तर दुसरीकडे रवी राणा यांच्या मुंबईच्या खार इथल्या फ्लॅटची पालिकेचं पथक पाहणी करणार आहे. या घरात अवैध बांधकाम झाल्याचा आरोप करत पालिकेनं नोटीस बजावली आहे. त्यामुळे राणांच्या घरावर हातोडा पडणार का याकडं लक्ष लागलं आहे. 


राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला आहे. दरम्यान, शनिवारच्या सुनावणीवेळी राणा दाम्पत्याच्या कोठडीत न्यायालयाकडून आजपर्यंत (4 मे पर्यंत) वाढ करण्यात आली होती.  


नेमकं प्रकरण काय? 


सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. 


तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सध्या राणा दाम्पत्य कारागृहात असून खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत. राणा दाम्पत्यानं त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. 30 एप्रिलला राणा दाम्पत्याच्या जामीनावर सुनावणी घेण्यात आली. परंतु, न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे.