शिवसेना नेत्या निलम गोऱ्हेंना जीवे मारण्याची धमकी
एबीपी माझा वेब टीम | 28 Feb 2017 09:32 PM (IST)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आपल्याला जीवे मारण्याची धमकी देणारे एसएमएस येत असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबईचे पोलीस सहआयुक्त देवेन भारती आणि पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. निलम गोऱ्हेंनी दिलेल्या माहितीनुसार 21 फेब्रुवारीला संध्याकाळी त्यांना धमकी देणारा मेसेज आला. त्यानंतर पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे निलम गोऱ्हेंनी फोन बंद केला. मात्र गोऱ्हे यांच्या दुसऱ्या नंबरवर 27 तारखेला पुन्हा धमकीचा मेसेज आला. गोऱ्हेंनी मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबत तक्रार केली असून त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. निलम गोऱ्हेंनी अद्याप कुणावरही संशय व्यक्त केला नसून, धमकी देणाऱ्याला अटक करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.