नवी दिल्ली : महाराष्ट्रात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. त्याचसोबत, मुख्यमंत्र्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर संबंधित केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेत मोठे निर्णय पदरी पाडले. यामध्ये गड-किल्ले संवर्धन, कोस्टल रोड आणि तूर खरेदी यांबाबत महत्त्वाचे निर्णय दिल्लीत झाले.
गड-किल्ले संवर्धन
दिल्लीत आज रायगड आणि इतर शिवकालीन किल्ल्यासंदर्भात मोठी घडामोड घडली. गड-किल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारनं जो आराखडा तयार केला आहे, त्यात यापुढे केंद्राकडून ढवळाढवळ केली जाणार नाही. कारण परवानग्यांचे निर्णय खालच्या पातळीवरच घेऊ द्यायला केंद्राने तयारी दर्शवली आहे. गडावर काही करायचं म्हटल्यावर दिल्लीचे हेलपाटे मारावे लागायचे, ते आता बंद होणार आहेत. त्यामुळे 500 कोटींचा विकास आराखडा असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचं काम आता वेगानं मार्गी लागणार आहे.
केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली. मात्र, शिवस्मारकाच्या जलपूजनानंतरच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित हीच मागणी केली होती. त्यामुळे यावरुन आगामी काळात श्रेयवादाची लढाईही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
कोस्टल रोडसाठी सीआरझेडची परवानगी
मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडसाठी एका महिन्यात पर्यावरण खात्याकडून सीआरझेडची परवानगी मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दिल्लीत पर्यावरण मंत्र्यांशी बैठक झाल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
मुंबईतील मरीन ड्राईव्हपासून कांदिवलीपर्यंत होऊ घातलेला कोस्टल रोड विविध परवानग्यांसाठी अडकून पडला होता. यापूर्वी हेरिटेज समितीने कोस्टल रोडला परवानगी दिली होती. मुंबईशी निगडीत 16-17 पर्यावरण विषयक विषयांवर मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली. सीआरझेड क्लिअरन्समुळे ज्या झोपड्यांचं पुनर्वसन रखडलंय त्याबाबत लवकरच परवानग्या मिळतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी कोस्टल रोडचा मुद्दा कायम चर्चेत ठेवला. शिवाय, कोस्टल रोड हे शिवसेनेचं स्वप्न असल्याचंही सांगितलं. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन परवानगी मिळवल्याने कोस्टल रोडवरुनही सेना-भाजपमध्ये आगामी काळात श्रेयाचं राजकारण पाहायला मिळेल.
तूर खरेदीच्या मुदतीत वाढ
तूरडाळ खरेदीची मुदत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्टिवटरवरून यासंदर्भातली माहिती दिली. या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे आभार व्यक्त केले आहेत. कालच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते की, संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरु ठेवावे. दरम्यान, आता केंद्रानेही तूरडाळ खरेदीच्या मुदतीत वाढ केली आहे.