मुंबई : राहुल गांधींसोबत केलेली वर्तणूक म्हणजे लोकशाहीचा गँगरेप असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. काल जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे. राहुल गांधी यांना मिळालेल्या वागणुकीचा निषेध करतो, असं संजय राऊत म्हणाले.


राऊत यांनी काल म्हटलं होतं की, मी ती दृश्यं पाहिली, ते थांबवता आलं असतं. मात्र ज्या पद्धतीनं राहुल गांधींसोबत धक्काबुक्की केली गेली, ते ठीक नव्हतं, असं संजय राऊतांनी म्हटलं. हाथरसमध्ये पीडितेवर रेपनंतर हत्या केली गेली. त्यात तिचा मृत्यू झाला. तिच्या अंत्यसंस्कार देखील परिवाराला करु दिले नाहीत. जर तुम्ही पीडितेचा आवाज ऐकू शकत नाहीत, पीडित परिवाराचा आवाज दाबताय तर तुम्हाला 'बेटी बचाओ' ची घोषणा करण्याचा अधिकार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते.


हाथरस बलात्कार प्रकरणी शिवसेना रस्त्यावर 


हाथरस बलात्कार प्रकरणी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. आज चर्चगेट स्टेशनसमोर निदर्शने करणार आहे. या आंदोलनात शिवसेनेने अनेक बडे नेते सामील होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर भाजपकडून सुशांतसिंह प्रकरणात आरोप होत आहेत. कंगनाविरुद्ध सेना असा वाद देखील रंगला होता. आज शिवसेना भाजपविरोधात रस्त्यावर उतरणार आहे.


राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. राहुल गांधी यांना कलम 188 अंतर्गत अटक करण्यात आली होती. हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पायी चालत निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं आणि राहुल गांधी यांना अटक केली. तुम्ही मला का आणि कोणत्या कलमांतर्गत अटक करत आहात, असा प्रश्न राहुल गांधी यांनी अटकेपूर्वी पोलिसांना केला होता. परंतु कलम 144 लागू असल्याने आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही, असं उत्तर पोलिसांनी त्यांना दिलं. यानंतर काही वेळाने राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केली. राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला रवाना झाले. मात्र त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यानंतर राहुल आणि प्रियंका यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी " ये देखो आज का हिंदुस्तान," असं राहुल गांधी एबीपी माझाच्या प्रतिनिधीशी बोलत होते. त्याचवेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले. यानंतर उठून ते पुन्हा चालू लागले.


संबंधित बातम्या