मुंबई : मुख्यमंत्र्यांना मुंबईतला पराभव दिसत असल्यामुळं त्यांनी बेछूट आरोप करायला सुरूवात केली आहे. आरोप करण्यात हे रजनीकांतचे बाप निघालेत, असा पलटवार शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केला आहे.
शिवसेनेनं सर्वाधिक गुन्हेगारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याचा आरोप काल मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्या आरोपांना आज अनिल परब यांनी उत्तर दिलं आहे. ते मुंबईत बोलत होते.
20 वर्षे मुंबई महापालिकेमध्ये सत्तेचे भागीदार असताना मुख्यमंत्र्यांना घोटाळे का दिसले नाही,असा प्रतिसवालही अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. जर मुंबईत रस्ते आणि नालेसफाई घोटाळा झाला असेल तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.
"मोटरसायकल, ऑटो रिक्षामधून गाळ घेऊन जाऊ शकतो का? असे आरोप करताना वास्तुस्थितीचं भान तर ठेवलं पाहिजे. हे आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावेत.", असं आव्हान अनिल परब यांनी भाजपला दिले आहे. शिवाय, मुख्यमंत्र्यांना पायउतार करण्याची त्यांच्याच लोकांनी सुपारी घेतली आहे, म्हणून त्यांचे सल्लागार असे आरोप करायला लावत आहेत, असेही परब यावेळी म्हणाले.
काल मुख्यमंत्र्यांनी रस्ते घोटाळ्याची आकडेवारी जाहीर करून मुंबईतल्या खड्ड्यांसाठी शिवसेनाच जबाबदार असल्याची टीका केली होती. आता त्या आरोपांना उद्धव ठाकरे आजच्या सभेत काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.