मुंबई: "भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्याबाबत त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं होतं. बाळासाहेबांनी मला विचारलं, त्यावेळी मुंडे मुख्यमंत्री होऊदे पण मला त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायचं नाही, असं मी सांगितलं. त्यानंतर बाळासाहेबांनी सत्ता नाकारली, असं म्हणत बाळासाहेब जे बोलतील ते करुन दाखवणारे होते, पण उद्धव ठाकरे तसे नाहीत, असा घणाघात काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला. ते 'माझा कट्टा'वर बोलत होते.


तसंच शिवसेनेचे मंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे 18 तारखेला खिशातला राजीनामा राज्यपालांकडे देतात का, ते पाहू असंही राणे म्हणाले.

नारायण राणे यांनी महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'माझा कट्टा'वर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

बाळासाहेब असते तर शिवसेना-भाजपमध्ये इतके तणाव झालेच नसते. त्यांनी भाजपला कधीच बाजूला केलं असतं. बाळासाहेबांनी कधीही सत्तेची हाव केली नाही, पण उद्धव ठाकरे तसे नाहीत, अनेकदा अपमान होऊनही, सत्तेला चिटकून आहेत, असं म्हणत राणेंनी हल्ला चढवला.

मी आणि मुंडे चांगले मित्र

मी आणि गोपीनाथ मुंडे चांगला मित्र होतो. मी मुख्यमंत्री आणि ते उपमुख्यमंत्री होते. युतीच्या प्रचाराला एकत्र जात होतो. त्यांना मासे खायला मी शिकवलं, अशी आठवण राणेंनी यावेळी सांगितलं.

मुंडेंनी केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी मी त्यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या. त्यांनी मला भेटायला बोलावलं. नितीन गडकरीही मला बोलावत होते, मात्र त्याचा अर्थ मी भाजपमध्ये जाणार असा होत नाही, असं राणेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरे बोलतात ते करत नाही

बाळासाहेब जे बोलत होते, ते करुन दाखवत होते. मात्र उद्धव ठाकरे तसे नाहीत. शिवेसना मंत्री लहान पोरासारखं राजीनामा खिशात घेऊन फिरतात. राजीनामा द्यायचा असतो, दाखवायचा नसतो. त्यामुळे उद्धव ठाकरे बोलल्याप्रमाणे 18 फेब्रुवारीला शिवसेना मंत्री राजीनामा देतात का ते पाहू, असं नारायण राणे म्हणाले.

मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव

भाजपवाले मुंबईतील महत्त्वाची केंद्रं बाहेर हलवत आहेत. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव आहे. निवडणुका आल्या की हे म्हणतात छत्रपतींचा आशिर्वाद. पण महाराजांचा आशिर्वाद फक्त यांनाच आहे का, निवडणुकीत यांना महाराज आठवतात, असा हल्ला राणेंनी चढवला.

बीएमसीतील भ्रष्टाचाराला दोघेही जबाबदार

बीएमसीतील भ्रष्टाचारावरुन भाजप नेते शिवसेनेवर टीका करत आहेत. मात्र भाजपही तिथे सत्तेत होती. त्यामुळे बीएमसीतील भ्रष्टाचाराला दोघेही जबाबदार आहेत, असा आरोप राणेंनी केला.

मुख्यमंत्र्यांना शोभत नाही

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावर आहेत. मात्र ते पाणी पाजेन, जबड्यात हात घालेन असं म्हणतात, पण एखाद्या मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला हे न शोभणारं आहे. त्यांना जबाबदारीचं भान नाही, असं राणे म्हणाले.

दोन सोडून सर्व शिवसैनिकांशी मैत्री

उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांच्याव्यतिरिक्त आजही शिवसेनेच्या सर्व नेत्यांशी माझे जवळचे संबंध आहेत. आजही गरज असेल तिथे शिवसेना नेत्यांना मी मदत करतो. मात्र रामदास कदम हा मैत्री करण्यासारखा माणूस नाही, असं राणेंनी नमूद केलं.

रामदास कदम आणि मी एकाचवेळी आमदार झाल्याची आठवणही राणेंनी सांगितली.

देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण देणार नाहीत

जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आहेत, तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही, असा दावा राणेंनी केला.

या सरकारने एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 18 महिने घेतले, त्यावरून त्यांची तत्परता दिसते. फडणवीस फक्त 5 वर्ष झुलवत ठेवणार, पण मराठा आरक्षण देणार नाहीत, असं राणे म्हणाले.

दंगलीवेळी उद्धव ठाकरे नव्हते

उद्धव ठाकरे आता सांगतात की 1992-93 च्या दंगलीत शिवसेनेने मुंबई वाचवली. पण ते खरं असलं तरी त्यावेळी उद्धव ठाकरे नव्हते, माझ्यासारखे शिवसैनिक पुढे होते, म्हणून मुंबई वाचली. उद्धव ठाकरे 1999 नंतर राजकारणात आले, असं राणेंनी सांगितलं.

काँग्रेसमधील मतभेद दूर

काँग्रेसमधील मतभेद आता दूर झाले आहेत, सर्व नेते प्रचारात उतरलेत. मराठी माणसासांठी आपला पक्ष आहे, हे काँग्रेसने वर्तणुकीतून दाखवायला हवं होतं. तसं झालं नाही हे मला मान्य आहे. पण आता आम्ही जोमाने तयारीला लागलो आहे, असं राणे म्हणाले.

25 वर्षात मुंबई बकाल

25 वर्षात परदेशात मोठी शहरं झाली, पण मुंबई बकाल झाली. मुंबईच्या कोणत्याही भागात गेला तर बकाल मुंबई दिसेल. अभ्यासाचा अभाव, माहितीची जाण, हक्क आणि कर्तव्य माहीत नसणं यामुळेच मुंबईचं हे हाल झाल्याचा आरोप नारायण राणेंनी केला.

रस्ते, पाणी किंवा मुलभूत प्रश्नांसाठी नगरसेवक असावेच असं नाही. ती कामं थांबत नाहीत, त्यापलीकडे कामं होणं आवश्यक असतं. मुंबईत एकहाती सत्ता मिळाली, तर मुंबईचं रुपडं पालटता येईल, असं म्हणत काँग्रेसही सत्तेच्या शर्यतीत असल्याचं  राणे म्हणाले.

रेटिंगमध्ये महाराष्ट्र पिछाडीवर

युती सरकारच्या काळात सध्या महाराष्ट्र पिछाडीवर पडला आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत पैसाच नाही. मात्र तरीही हे मोठमोठी आश्वासनं देत लोकांची फसवणूक करत आहेत. स्मारकांसाठी हजारो कोटी, मेट्रोचं उद्घाटन केलं, पण तुमच्याकडे पैसेच नाहीत तर त्याचं टेंडर कसं काढणार? असा सवाल राणेंनी केला.

गडकरी पुतळा प्रकरणात नितेश चुकला

राम गणेश गडकरींचा पुण्यातील पुतळा हटवणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना 5 लाखाचा चेक देणं ही नितेश राणेंची चूक होती. त्याबद्दल मी त्यांना समज दिली, तसंच शक्य तिथे माफी मागण्याच्या सूचना दिल्याचं राणे म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण आणि वाद हे चुकीचं सूत्र

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि वाद हे चुकीचं सूत्र होईल. ते कोणत्याही वादात नसतात. पोलिसांप्रमाणे वाद झाल्यानंतर ते येतात अशी कोपरखळी राणेंनी मारली.

माझा कट्टावरील मुद्दे

  • मुंबईत अनेक रोगांचा प्रसार, घाण आणि दुर्गंधीचं साम्राज्य - नारायण राणे

  • झोपडपट्टीधारक पक्क्या घरात जावा, हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं - नारायण राणे

  • काँग्रेसमध्ये अस्वस्थ होत असलं, तरी सांगणार कोणाला, मला अयोग्य वाटेल तिथे बोलतोच

  • प्रत्येक गोष्ट दिल्लीपर्यंत कशाला नेता, इथल्या गोष्टी इथेच मिटवा

  •  प्रत्येक पक्षात बंडखोरी, आता निष्ठा फक्त लिहिण्यापूर्ती राहिली - नारायण राणे

  • संजय निरुपमांची कार्यशैली घातक होती, त्यावर मी बोट ठेवलं, अधिक बोलणार नाही

  •  मुंबईत शिवसेना-भाजपपाठोपाठ सत्तेच्या शर्यतीत काँग्रेसचाही नंबर

  •  शिवसेना-भाजप दोन्हीही सत्तेत असून एकमेकांवर आरोप करतात - नारायण राणे

  • मुख्यमंत्र्यांना जवळून पाहतोय, त्यांची भाषा अत्यंत चुकीची - नारायण राणे

  •  पाणी पाजेन, जबड्यात हात घालेन, ही भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही- नारायण राणे

  •  मुख्यमंत्री म्हणतात कायदे करु, पण कायदे महापालिकेत होत नाहीत, हे त्यांना माहीत नाही का

  • मुंबईच्या विविध भागात जाऊन बकाल रुप पाहा, ही मुंबई आहे वाटणारच नाही- नारायण राणे

  •  साहेब जे बोलत होते ते करत होते, पण उद्धव ठाकरे तसे नाहीत - नारायण राणे

  •  मुंबईचं स्थान कमी करण्याचं काम भाजप करतंय, शिवसेना सत्तेत का?- नारायण राणे

  • लहान पोरासारखं राजीनामा खिशात घेऊन कशाला फिरता, राजीनामा द्यायचा असतो, दाखवायचा नसतो-

  • महाराजांचा यांनाच आशिर्वाद आणि आम्हाला नाही का, निवडणुकीत यांना महाराज आठवतात - नारायण राणे

  • राज्याच्या तिजोरीत काय आहे? मुंबईला किती रुपये दिले?- नारायण राणे

  •  आता रेटिंगमध्ये महाराष्ट्र दिवाळखोरीत आहे, यांच्याकडे आर्थिक तरतूद नाही - नारायण राणे
    स्मारकांसाठी हजारो कोटींच्या घोषणा, पण पैसा आणणार कुठून?- नारायण राणे

  • मेट्रोचं उद्घाटन केलं, पण पैसाच नाही तर टेंडर कसं निघणार? - नारायण राणे
    भाजपवाले शिवसेनेवर आरोप करतात, पण मनपातील भ्रष्टाचारासाठी दोघेही सारखेच जबाबदार

  •  पृथ्वीराज चव्हाण हे कधीच वादात नाहीत, वाद आणि पृथ्वीराज चव्हाण हे सूत्र न जमणारं

  • काँग्रेसमध्ये आलो, तर काँग्रेसचे संस्कार स्वीकारायला हवे, अन्यथा किक बसेल

  • मुंडे आणि मी मित्र होतो, युतीच्या प्रचाराला एकत्र जात होतो, मासे खायला मी शिकवलं

  • मुंडेंनी मला भेटायला बोलावलं होतं, गडकरी पण बोलले, पण त्याचा अर्थ मी भाजपमध्ये जाणार असं होत नाही-

  • 18 तारखेनंतर बघू उद्धव ठाकरे बोलतात ते करुन दाखवतात का, राजीनामा देतात का पाहू - नारायण राणे

  •  शिवसेनेतील आमदार बाहेरुन गेलेले, त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता-

  • शिवसेना राजीनाम्याचं नाटक करतंय, सेना-भाजपची युती न टिकायला यांचे मंत्रीच जबाबदार

  •  शिवसेना मंत्री कामाचे नाहीत हे उद्धव ठाकरेंनी ओळखलंय, त्यामुळे राजीनाम्याची तयारी

  • मुख्यमंत्री म्हणतात 5 वर्षे सत्ता राहील, म्हणजेच सेनेचे आमदार त्यांच्या गळाला लागलेत

  •  5 राज्यात पाहायला वेगळी टीम, महाराष्ट्रात आम्ही आहोत

  •  प्रत्येक व्यक्तीला, पक्षाला बॅड पॅच येतो, आम्हाला 2014 ला बॅडपॅच आला-

  •  आता वाद बाजूला ठेवून  काँग्रेसच्या हितासाठी एकत्र येणं आवश्यक

  •  मनमोहन सिंह हे जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ, त्यांचा आदर सर्वच जण करतात

  • राष्ट्रवादी आणि भाजपची युती होईल असं मला वाटत नाही- नारायण राणे

  • मनमोहन सिंहांबद्दल प्रेम असेल, म्हणून उद्धव ठाकरे चांगलं बोलले असतील

  •  सत्ता असल्याशिवाय काम करु शकत नाही,  - नारायण राणे

  •   भाजपविरोधात तीन पक्ष एकत्र येतील, असं वाटत नाही

  •   भाजपने राष्ट्रवादीसोबत छुपी युती केली आहे, त्यामुळेच आशिष शेलार काँग्रेस-शिवसेनेची युती असल्याचा आरोप करतात

  • राष्ट्रवादीची युती मुंबईसह सगळीकडे

  • राष्ट्रवादीच्या जोरावर भाजपच्या उड्या, युती तुटल्यास त्यांची साथ मिळेल अशी आशा

  •  सत्तेसाठी शिवसेनेने युती केली, पण यांच्या मंत्र्यांना अधिकारच नाहीत

  •  पवार साहेबांना सिरीयस घेत नाही, ते आधीच भाजपसोबतच्या युतीसाठी तयार होते

  • बाळासाहेब असते तर युतीत इतके तणाव नसतेच, भाजपला त्यांनी हाकललं असतं-

  •  गोपीनाथ मुंडेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं

  •  मुंडेंच्या नेतृत्त्वात मी मंत्री होणार नाही असं सांगितलं, त्यावेळी बाळासाहेबांनी सत्ता नाकारली

  • बाळासाहेबांकडे सत्ता नसूनही 45 वर्षे सत्तेप्रमाणे वागले, शिवसेनेला बाळासाहेब समजलेच नाहीत-

  • मराठी-मराठी करता, पण लालबाग-परळ खाली झाला, कोणता मराठी माणूस शिल्लक आहे?

  •  उद्धव ठाकरे म्हणतात प्रॉपर्टी टॅक्स रद्द करणार, मग तो आधी लावलाच का?

  •  बीएमसीचं बजेट 36 हजार कोटी, त्यापैकी विकासाला किती?

  •   गरिबांना घरं देऊ असं मोदी म्हणाले होते, पण बांधकाम कुठं सुरु आहे? -

  •  गडकरी पुतळ्याबाबत नितेश राणेंनी जे केले ते चुकीचं होतं, त्यांना मी समज दिली

  • गडकरी पुतळ्याबाबत नितेश राणेंना मी माफी मागायला सांगितली, त्यांनी ती मागितली

  • देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही, यांनी अफेडेव्हिटसाठी 18 महिने लावले -

  •  भाजप सरकार सूडाचं राजकारण करतंय, पण नारायण राणे कधीही गप्प बसणार नाही

  •  वांद्र्याच्या पोटनिवडणुकीत मी लढणार नव्हतो, पण मी फाईट दिली, मात्र पराभव हा पराभव आहे, कारणं द्यायची नसतात-

  •  विधानपरिषदेबाबत मला सोनिया गांधींनी मला बोलवून तिकीट दिलं-

  • मला जेवढी पदं मिळालीत, तेवढी पदं महाराष्ट्रात कोणालाही मिळाली नाहीत

  •  उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांच्याव्यतिरिक्त सर्व शिवसैनिकांशी जवळचे नातं

  •  राज ठाकरेंना परवा तब्येतीच्या विचारणेसाठी फोन केला

  • 16व्या वर्षी शिवसेनेत आलो, 1966 ते 2005 पर्यंत शिवसेनेत होतो-

  •   मुंबईचा खडा अन खडा मला माहिताय, तेवढी माहिती संजय निरुपम यांना आहे की नाही माहित नाही -

  • 92-93 च्या दंगलीत उद्धव ठाकरे कुठेच नव्हते, आम्ही त्यावेळी मुंबई वाचवण्यासाठी पुढे होतो