मुंबई : विधानसभेत जात पडताळणी तरतुदीसंदर्भात बिल काढण्यासाठी आज शिवसेनेची सर्व शक्ती पणाला लागली होती. मात्र कामकाजाच्या गडबडीत बिल काढण्यास विलंब झाल्यामुळे शिवसेनेचे आमदार-मंत्री पक्षाचा व्हीप झुगारुन सभागृहात अनुपस्थित राहिले.


मुंबईतील सायन कोळीवड्याच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराला अर्ज भरण्यास उद्या (मंगळवार) शेवटची तारीख आहे. यात शिवसेनेच्या उमेदवाराला अर्ज भरताना जात पडताळणीचा नियम अडसर ठरत आहे. यासाठी आज या बिलात तरतूद करुन ते बिल पास करुन घेणं शिवसेनेसाठी महत्वाचं होतं.

तरीही दिवसभराचं कामकाज तहकूब करण्याआधी भाजपचे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी ऐन वेळेस बिल काढण्याची आठवण करुन दिली आणि कामकाज सुरु ठेवण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांना केली.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव आणि गिरीश बापट यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. अखेर कामकाज सुरु ठेवण्यात आलं आणि बिल काढण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र विरोधकांनी पुन्हा कोरमचा मुद्दा उपस्थित करुन शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

अखेर शिवसेना प्रतोद सुनील प्रभू आणि नेते मिलिंद नार्वेकर यांची आमदार-मंत्र्यांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी फोन करता-करता दमछाक उडाली आणि कसंबसं बिल मंजूर होण्यासाठी कोरम दाखवण्यात आला. त्यामुळे एका पोटनिवडणुकीच्या उमेदवारासाठी अख्ख्या विधिमंडळात शिवसेनेची धावाधाव झाल्याचं चित्र बघायला मिळालं.

सूत्रांच्या माहितीनुसार या बिलासाठी स्वतः उद्धव ठाकरे आज शिवालयात तळ ठोकून होते, तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये विशेष लक्ष घातले होते. मात्र यामुळे शिवसेनेचं ढिसाळ फ्लोअर मॅनेजमेंट चव्हाट्यावर आलं.