मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये छापून आलेल्या वादग्रस्त व्यंगचित्रावरुन बराच वादंग निर्माण झाला आहे. आज 'सामना'च्या नवी मुबंई आणि ठाण्यातील कार्यालयांवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली. या संपूर्ण प्रकारानंतर शिवसेनेनं आपली याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
व्यंगचित्राचा वाद राजकीय फायद्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी पेटवत आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. अशी भूमिका शिवसेनेच्या वतीनं घेण्यात आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यासंदर्भात पत्रक काढून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.
वादग्रस्त व्यंगचित्र ही शिवसेनेची भूमिका नाही असं म्हणत शिवसेनेनं प्रसिद्धीपत्रकातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे. मराठा समाजास रस्त्यावर उतरण्यास भाग पाडणारे देखील हेच पक्ष असल्याचा सेनेनं आरोप केला आहे.
दरम्यान, व्यंगचित्राप्रकरणी सुरु असलेल्या राजकारणामागे काँग्रेस-राष्ट्रवादी आहे. मात्र त्यांचा हा विघ्नसंतोषीपणा खपवून घेतला जाणार नाही. असंही सेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
व्यंगचित्राप्रकरणी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणारे प्रसिद्धीपत्रक:
काँग्रेस-राष्ट्रवादीचा विघ्नसंतोषीपणा खपवून घेणार नाही- सुभाष देसाई
मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सामनामधील व्यंगचित्राचा वाद पेटविणाऱ्या समाजकंटकांचा पर्दाफाश केल्यानंतर निवळलेले वातावरण पुन्हा पेटविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न विरोधी पक्षनेते विखे पाटील व धनंजय मुंडे करीत आहेत.
खरे तर मराठा समाजास रस्त्यावर उतरण्यास भाग पाडणारे दुसरे तिसरे कोणी नसून काँग्रेस राष्ट्रवादीवालेच आहेत. पंधरा वर्ष सत्ता भोगताना ना त्यांनी मराठा समाजासाठी कोणती ठोस योजना आणली ना धड आरक्षणाची अंमलबजावणी केली. मोठा गाजावाजा करत आपल्याच समितीकडून अहवाल बनवून घेण्याचा फार्स करत कोर्टात न टिकणारे धोरण समाजाच्या तोंडावर फेकले. शेवटी कोर्टाने ते सदोष ठरविले. आपली नामुष्की लपविण्यासाठी आघाडीचे नेते आता शिवसेनेवर आगपाखड करीत आहेत.
मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्वत्र डौलाने फडकणारे भगवे झेंडे विखे-पाटील व मुंडे जोडगोळीला बघवत नसावेत त्यातूनच हा पोटशूळ उठलेला दिसतो. मोठ्या शिस्तीने व योग्य दिशेने चाललेल्या विक्रमी मोर्चाबद्दलची असूयाही यामध्ये दिसते. मराठा आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णपणे पाठिंबा दर्शवून आयोजकांना संपूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्या. रविवारच्या लेखात संजय राऊत यांनी भूमिकेचे समर्थन केलं. मुख्यमंत्र्यांनीही आरक्षण देणारच अशी घोषणा केली. हे सर्व सुरळीत वातावरण बिघडवणाऱ्या विखे-मुंडे जोडीचा विघ्नसंतोषीपणा जनता खपवून घेणार नाही व मराठावीर या चाळ्यांनी विचलीत होणार नाहीत.
संबंधित बातम्या:
उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी: राधाकृष्ण विखे-पाटील
'सामना'तील व्यंगचित्राचा निषेध, सेना पदाधिकाऱ्यांत राजीनामासत्र
'ते' व्यंगचित्र छापलं नसतं, तर बरं झालं असतं : नीलम गोऱ्हे
'सामना'च्या कार्यालयावर वाशीत दगडफेक, ठाण्यात शाईफेक
कार्टूनमुळे शिवसेनेची मराठा मोर्चाबाबतची भूमिका समजली : मुंडे
मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या, पण.. : शरद पवार