मुंबई: 'शिवेसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये छापलेल्या वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी.' अशी मागणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. ट्विटरवरुन त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

'सामना कार्यालयावरील दगडफेक हा मराठा समाजाच्या संतापाचे प्रतिक'

‘सामना’ कार्यालयांवर झालेली दगडफेक ही ‘सामना’च्या व्यंगचित्रातून झालेल्या अवमाननेविरोधात मराठा समाजाच्या संतापाचे प्रतिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘सामना’च्या व्यंगचित्रामध्ये मराठा मोर्चासह सर्वच समाजातील महिलांचाही अवमान करण्यात आल्याचा आरोपही विखे-पाटलांनी केला आहे.


'शिवसेनेची मराठा समाजाविषयची नकारात्मक मानसिकता उघड'

मराठा समाजाविषयी शिवसेनेची असणारी नकारात्मक मानसिकता ही ‘सामना’च्या व्यंगचित्रातून उघड झाली आहे. असाही हल्लाबोल विखे-पाटलांनी केला आहे.

'उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी'

या व्यंगचित्रामध्ये कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेले सैनिक व पोलिसांचाही अवमान केला आहे. शहिदांप्रती शिवसेनेचा कळवळा ढोंगी असतो, हे व्यंगचित्रातून आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मराठा समाज, महिला, सैनिक, पोलीस व शहिदांच्या कुटुंबीयांची जाहीर माफी मागावी. अशी मागणी विखे-पाटलांनी केली आहे.

'सरकारनं सामनावर कारवाई करावी'

दरम्यान, मराठा समाजाचा अवमान करणाऱ्या सामना वृत्तपत्राला सरकारी जाहिराती देणं सरकारने तातडीने बंद कराव्यात. तसेच ‘सामना’तील व्यंगचित्राशी सहमत नसल्यास सरकारने त्यांच्याविरोधात तातडीने कारवाई करावी. अशी मागणी करुन विखे-पाटलांनी सरकारलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातम्या:

'सामना'च्या कार्यालयावर वाशीत दगडफेक, ठाण्यात शाईफेक

कार्टूनमुळे शिवसेनेची मराठा मोर्चाबाबतची भूमिका समजली : मुंडे