मुंबई : शिंदे गटाच्या वतीनं बीकेसीवर घेण्यात येणाऱ्या दसरा मेळाव्याला (Dasara Melava) अवघे काही तास उरले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. केवळ माझा मुलगा असला म्हणून तो वारसदार नसेल, तर जो वारसदार असेल तोच माझा मुलगा असेल या आशयाच्या हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी एकनाथ शिंदे यांनी शेअर केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी या ट्वीटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे नव्हे तर आपणच शिवसेनेच्या विचारांचे वारसदार असल्याचा दावा केल्याचं बोललं जातंय. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज बीकेसीवर जंगी सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून त्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांची गर्दी जमवली जात आहे. या सभेला अवघे दोन-तीन तास उरले असताना एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट केलं आहे. प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांच्या दोन ओळी एकनाथ शिंदे यांनी शेअर केल्या आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, केवळ माझा मुलगा असला म्हणून तो उत्तराधिकारी नसेल, तर जो उत्तराधिकारी असेल तोच माझा मुलगा असेल. 


 






एकनाथ शिंदे यांनी या ट्वीटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला असल्याचं स्पष्ट आहे. तसेच उद्धव ठाकरे हे केवळ बाळासाहेब ठाकरे याचे सुपुत्र असल्याने ते शिवसेनेचे उत्तराधिकारी होऊ शकत नाहीत, आपणच त्यांच्या विचारांचे वारसदार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन


बीकेसीवर होणाऱ्या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने जमा व्हा असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरून कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटलं आहे की, "विकासाच्या यात्रेत देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी बाळासाहेबांचे विचार महत्वाचे आहेत. माय-बाप जनतेचं कल्याण साध्य करण्यासाठी आज आपण संकल्प करूयात, बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटूयात बीकेसी मैदानावर."