मुंबई : मुंबईत महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये मोबाईल जॅमर लावण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. अभिनेता सुमित राघवन यांच्या नाटकादरम्यान घडलेल्या मोबाईल रिंग नाट्यानंतर मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जँमर लावण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सूचनेद्वारे ही मागणी केली आहे.

नाट्यगृहात प्रेक्षकांचा रसभंग करणाऱ्या आणि कलाकारांच्या सादरीकरणातही व्यत्यय आणणाऱ्या मोबाईलला जॅमर लावायला हवेत अशी ही मागणी आहे. शिवसेना नगरसेविका शितल म्हात्रे यांची महापालिका सभागृहासमोर ठरावाच्या सुचनेद्वारे मागणी केली आहे.

मोबाईलमुळे नाटकाच्या प्रयोगात येणाऱ्या व्यत्ययाबाबत प्रसिद्ध अभिनेते सुमीत राघवन यांनी संताप व्यक्त केला होता. 'नॉक नॉक सेलिब्रेटी' या नाटकाच्या प्रयोगदरम्यान अनेकांचे मोबाईल वारंवार वाजल्यामुळे सुमीत यांनी प्रयोग थांबवला होता. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सुमीत राघवन यांनी आपल्या रागाला वाट मोकळी करुन दिली.



काय घडलं होतं?

नाशिकमधील महाकवी कालिदास रंगमंदिरात 'नॉक नॉक सेलिब्रेटी' नाटकाचा प्रयोग सुरु होता. वेगवेगळ्या प्रेक्षकांचा मोबाईल त्या प्रयोगाला वाजला होता. एक व्यक्ती दरवाजा उघडून प्रेक्षागृहातून आत-बाहेर करत असताना दार दरवेळी आदळत होतं आणि मोठा आवाज येत होता. एक वयस्कर बाई दुसऱ्या बाईला 'अहो हळू बोला' असं म्हणाल्यावर‌ ती बाई दाराबाहेर जाऊन बोलू लागली, मात्र ते बोलणंही स्टेजवर एकू येत होतं. शेवटी पहिल्या रांगेतील एका प्रेक्षकाचा फोन वाजला आणि सुमीत यांनी चिडून नाटक बंद केलं.