मुंबई : मी निवडणूक लढवावी की नाही याचा निर्णय उद्धव साहेब आणि पक्षाचे नेते घेतील, असं सूचक वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. वरळी आणि माहिम विधानसभा मतदार संघातील युवासेना पदाधिकारी आणि आदित्य ठाकरेंची काल सोमवारी बैठक झाली. ही बैठक सुमारे अर्धा तास चालली आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.


“मी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही याबाबतचा निर्णय उद्धव साहेब आणि पक्षाचे नेते घेतील” असं आदित्य ठाकरेंनी बैठकीत स्पष्ट केलं. या बैठकीला शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि माहिमचे शिवसेना आमदार सदा सरवणकर, वरळीचे शिवसेना आमदार सुनील शिंदे उपस्थित होते. या बैठकीला आदित्य ठाकरेंनी माहिम आणि वरळी विधानसभा मतदार संघातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या मतांची तपशीलवार आकडेवारी घेऊन उपस्थित राहण्यास सांगितले होते.


आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पदाधिकारी-कार्यकर्त्याना नवीन मतदार नोंदणीचे लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे. तसेच माहिम आणि वरळी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला कुठल्या भागात मतदान कमी झाले आणि ते का? याचा अभ्यासही करण्याच्या सूचना आदित्य ठाकरेंनी बैठकीत दिल्या आहेत. या बैठकीत पावसाळी कामाचा आढावा घेण्यात आला.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार? इन्स्टाग्रामवर पोस्टमुळे चर्चांना उधाण