मुंबई : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेणाऱ्या दोन चिमुकल्यांना मात्र शॉक लागल्याने आपला जीव गमावावा लागला आहे. कांदिवलीमध्ये शॉक लागून दोन चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. चाळीत असलेल्या शिडीत वीजेचा प्रवाह उतरला आणि त्याच शिडीला दोन चिमुकल्यांचा स्पर्श झाल्यानं त्यांना जीव गमवावा लागला आहे.

सोमवारी रात्री मुंबईसह उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. यात वीजेचा शॉक लागून 11 वर्षीय तुषार झा आणि 10 वर्षांच्या ऋषभ तिवारी या लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दक्षिण मुंबईसह अंधेरी, सांताक्रूझ, घाटकोपर, मुलुंड या उपनगरीय भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली. विजांच्या कडकडाटासह सुमारे तासभर मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईलगतच्या ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीमध्ये देखील मुसळधार पाऊस पावसाने हजेरी लावली.



दरम्यान अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे काल सकाळी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले  आहे. ते आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. 13 आणि 14 जूनच्या दरम्यान ते गुजरातच्या किनारपट्टीचा धडकण्याची शक्यता आहे.

औरंगाबादेतही पहिल्याच पावसाचे तीन बळी

औरंगाबादमध्ये पावसामुळे तिघांना आपला जीव गमावावा लागला आहे. काल सोमवारी झालेल्या पावसामुळे भिंत कोसळून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला तर वीज कोसळून एका महिलेचा नाहक बळी गेला आहे.

औरंगाबादच्या खामखेडा परिसरात वीज पडून शेतात काम करणाऱ्या गंगाबाई भगुरे या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. औरंगाबाद शहरात भिंत कोसळून एका बालकाचा मृत्यू झाला आहे, तर शहरात आणखी एक भिंत कोसळून एक महिला दगावली आहे.