मुंबई : सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांकडील विद्यार्थी आणि पालकांचा वाढता ओढा लक्षात घेता मुंबई महापालिकेतही या केंद्रीय मंडळाच्या शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शुक्रवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत शिवसेना सदस्याने या शाळांसाठी मागणी केली आहे. त्यावर लवकरात लवकर चर्चा करुन प्रस्ताव मांडावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

'मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, तसेच इतर मंडळांच्या शाळांचा पर्याय खुला व्हावा, या उद्देशाने पालिकेने एक सीबीएसई आणि एक आयसीएसई शाळा सुरू करावी', अशी मागणी शिवसेनेचे शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी केली आहे.

'राज्य सरकारने विद्यार्थ्यांना सीबीएसई, आयसीएसई दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी राज्यात 'महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळा'च्या शाळादेखील सुरु कराव्यात अशी मागणीसुद्धा या बैठकीत करण्यात आली आहे. यावर प्रस्ताव सादर करुन आयुंक्तासोबत चर्चा केली जाईल आणि त्यानंतर पुढील विचार केला जाईल.