मुंबई: शिवसेनेने सालाबादप्रमाणे यंदाच्या दसरा मेळाव्यासाठीही जय्यत तयारी केली आहे. सेनेचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्कवर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सेनेने वाजत गाजत गुलाल उधळत शिस्तीने या! हिंदुत्वाची वज्रमूठ, आता ताकद दाखवणारच, असे होर्डिंग मुंबईत ठिकठिकाणी लावले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यात शिवसेना जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर हजेरी लावणार आहेत.
यादृष्टीने शिवसेनेची सध्या शिवाजी पार्कमध्ये जोरदार तयारी सुरु केली आहे. दसरा मेळावा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, पदाधिकारी यांनी चांगलीच कंबर कसली आहे. आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय भाष्य करतात याकडे भाजपासह इतर राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
23 जानेवारीला शिवसेनेच्या वरळी येथील राष्ट्रीय मेळाव्यात आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ‘मतोश्री’ला भेट देऊन, आगामी निवडणुकांसाठी युतीचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे या दसऱ्या मेळाव्यात युतीबाबत उद्धव ठाकरे काय भाष्य करतात याकडे भाजपासह इतर राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
याशिवाय राफेल करार प्रकरण, जीएसटी, काश्मीरमध्ये होणारे हल्ले, मी टू अशा मुद्द्यांवरही उद्धव ठाकरे भाष्य करण्याची चिन्हं आहेत. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी योजनांवरुन ते राज्य सरकारवर हल्ला चढवण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची दोन तास चर्चा
आता ताकद दाखवणारच, दसरा मेळाव्यानिमित्त सेनेचे पोस्टर्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Oct 2018 08:30 AM (IST)
सेनेचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्कवर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सेनेने वाजत गाजत गुलाल उधळत शिस्तीने या! हिंदुत्वाची वज्रमूठ, आता ताकद दाखवणारच, असे होर्डिंग मुंबईत ठिकठिकाणी लावले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -