भिवंडी :  ब्रँडेड कपड्यांची हुबेहुब नक्कल करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा आज ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून ग्राहक, मॉलमधील, तसेच शहरातील शोरुम्सचे दुकानदार या सगळ्यांचीच फसवणूक केली जात होती. याप्रकरणी पोलिसांना एकाला अटक केली आहे.


भिवंडीमध्ये रेडीमेड गारमेंट तयार करणाऱ्या अनेक स्थानिक कंपन्या आहेत. त्यांना मोठ्या कंपन्या त्यांचे शर्ट किंवा इतर रेडिमेड कपडे बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट देतात. त्यासाठी त्यांच्याकडे त्या ब्रँड्सचे टॅग्स आणि रॉ मटेरियल असतात. त्यांना मिळालेली ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर या स्थानिक कंपन्या कमी क्वालिटीचे रेडीमेड कपडे तयार करायच्या पण त्यांना टॅग मात्र मोठ्या कंपन्यांचे लावले जायचे. याप्रकरणी पोलिसांनी भरत दोशी नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.


मोठ्या ब्रँड्सचा तयार केलेला डुप्लिकेट माल विकण्यासाठी त्या कंपन्या एजंट पाठवतात किंवा ऑनलाईन विक्री करतात. त्यामुळे मोठ्या ब्रँड्सच्या नावाखाली कमी क्वालिटीचे कपडे विकून ग्राहकांची आणि दुकानदारांची फसवणूक केली जात होती.


भिवंडीत पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी घातल्या. यामध्ये पोलिसांनी एकाला अटक केली. धाडीत पोलिसांना ऑक्सेंबर्ग, पार्कस, केंब्रिज या भारतीय ब्रँड्सचे डुप्लिकेट कपडे मिळाले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या भरत दोशीकडून 776 शर्ट्स जप्त केले. या शर्ट्सवर ऑक्सेबर्गचे टॅग होते, तर त्याची किंमत साडे सात लाखाच्या आसपास आहे.


त्यामुळे तुम्ही जर डिस्काउंट किंवा पैसा वाचवण्याच्या नादात ब्रँडेड घेताना आपले डोळे नीट उघडे ठेवा आणि मगच खरेदी करा. कारण तुमचे ब्रँडेड कपडेही बनावट निघू शकतात