भिवंडी : लघुशंकेच्या वादातून पेट्रोलपंपाच्या मालक आणि मॅनेजरवर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार भिवंडीत घडला. मारहाणीनंतर पेट्रोल पंपाच्या ऑफिसची तोडफोडही करण्यात आली.
भिवंडी शहरातील जुन्या आग्रा रोडवरील बागे फिरदोस परिसरात इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. लघुशंकेच्या किरकोळ वादातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने पेट्रोल पंपाच्या मालकासह मॅनेजरला जबर मारहाण केली. त्यानंतर पेट्रोल पंप कार्यालयाची तोडफोडही केली. यामध्ये 45 वर्षीय पेट्रोल पंप मालक शकील अन्सारी आणि 33 वर्षीय मॅनेजर समीर अन्सारी जखमी झाले आहेत.
बागे फिरदोस परिसरातील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर काही तरुण रात्री उशिरा पेट्रोल भरण्यासाठी आले होते. लघुशंकेसाठी पेट्रोल पंपाच्या शौचालयांऐवजी त्यांनी दुसऱ्या ठिकाणी लघुशंका केली. त्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी या तरुणांना हटकलं. त्यावेळी कर्मचारी आणि तरुणांमध्ये बाचाबाची होऊन किरकोळ भांडण झालं.
स्थानिकांच्या मदतीने हे भांडण मिटवण्यात आलं, मात्र हे तरुण अर्ध्या तासानंतर पाच ते सहा साथीदारांसह पेट्रोल पंपावर आले आणि तोडफोड करायला सुरुवात केली. पेट्रोल पंप मालक आणि मॅनेजरने या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तरुणांनी दोघांच्या डोक्यावर लोखंडी खुर्चीने मारहाण करुन गंभीर दुखापत केली.
पेट्रोल पंपाचे मालक शकील अन्सारी आणि मॅनेजर समीर अन्सारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना भिवंडीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.