मुंबई: मुंबईत उद्या होणाऱ्या दसरा मेळावा हा ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या भवितव्याचा टर्निंग पॉईंट ठरु शकतो. त्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू झाली असून राज्याच्या कानाकोऱ्यातून लाखो कार्यकर्ते मुंबईकडे येत आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर होणाऱ्या या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने महारणनीती आखल्याचं दिसून येतंय. शिंदे गटाकडून होलोग्राम टेक्नॉलॉजीचा वापर करुन बाळासाहेबांच्या प्रतिमेला अॅनिमेशनच्या रुपात मंचावर उभं करण्यात येणार आहे. तसेच 51 फुटी तलवारीचे शस्त्रपूजनही करण्यात येणार आहे. 


दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांचे भाषण हे समीकरण लक्षात घेऊन शिंदे गटाकडून बाळासाहेबांचे जुन्या 40 व्हिडीओ मंचावर दाखवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाच्या दरम्यान हे व्हिडीओ दाखवण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी कशा प्रकारे बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली हे त्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. 


51 फुटी तलवारीचे शस्त्रपूजन 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाच्या दरम्यान 51 फुटी तलवारीचे शस्त्रपूजन करण्यात येणार आहे. त्याचसोबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना 12 फुटी चांदीची तलवार देण्यात येणार आहे. या आधी गीनिज बूकमध्ये 11 फुटी चांदीच्या तलवारीची नोंद आहे. त्यामुळे हा नवा विक्रम होऊ शकतो. 


पाच लाख वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांची तयारी 


शिंदे गटाच्या या मेळाव्यासाठी दोन ते तीन लाख लोक येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या लोकांच्या खाण्या-पिण्याची सोय करण्यासाठी व्यासपीठाच्या बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पाच लाख वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांची सोय करण्यात येणार आहे. 


शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी 400 बाय 1200 फुटी मंच तयार करण्यात आला आहे. या मंचावर उद्या ठाकरे गटातील व्यक्ती दिसू शकेल. फक्त शिवसैनिक किंवा कार्यकर्तेच नव्हे तर ठाकरे परिवारातील कुटुंब शिंदे गटासोबत असल्याचं यातून संदेश देण्यात येणार आहे. उद्याच्या मेळाव्यासाठी आठ वक्त्यांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती आहे.