Mumbai Drugs Case : मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वी कॉर्डेलिया क्रूझवरील छापेमारीमुळे चर्चेत आलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे सध्या खळबळ माजली आहे. वानखेडे बोलताना म्हणाले की, त्यांच्यावर बेकायदेशीर पद्धतीनं पाळत ठेवली जात आहे. तसेच मुंबई पोलीस दलातील काही पोलीस साध्या वेशात वानखेडेंवर पाळत ठेवत असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओशिवरा पोलीस स्थानकातील 2 पोलीस  समीर वानखेडेंच्या हालचालींवर पाळत ठेवून आहेत. 


समीर वानखेडेंनी यासंदर्भात तक्रार करताना एक सीसीटीव्ही फुटेजचाही आधार घेतला आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेटही घेतली आहे.


2 ऑक्टोबर रोजी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंच्या नेतृत्त्वात एनसीबीच्या एका पथकानं कॉर्डेलिया क्रूझवर छापा मारला होता. एजंन्सीनं दावा केला आहे की, क्रूझवरील छापेमारीत ड्रग्ज जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण 18 जणांना एनसीबीनं अट केल्याचं सांगितलं. 


क्रूझ ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेल्या छापेमारीनंतर राष्ट्रवादीकडून एनसीबीवर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले. महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी दावा केला होता की, एनसीबीनं केलेली कारवाई ही बनावट होती आणि यामध्ये भाजप नेत्यांसह अनेक बाहेरचे लोक सहभागी होते. तसेच नवाब मलिकांनी आरोप केला आहे की, एनसीबीने सुरुवातीला 11 लोकांना अटक केली होती. परंतु, भाजप नेते मोहित भारतीय यांच्या एका निकटवर्तीयासह तिघांना अवघ्या काही तासांत सोडण्यात आलं. तसेच पुढे बोलताना त्यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या फोन रेकॉर्ड्सचा तपास करणं गरजेचं आहे, अशी मागणीही केली. 


आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला, पुढची सुनावणी बुधवारी


क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानचा (Aryan Khan) मुक्काम बुधवारपर्यंत एनसीबी कोठडीतच असणार आहे. कारण आता आर्यनच्या जामीन अर्जावर थेट बुधवारी सुनावणी करण्यात येणार आहे. मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी आली होती. परंतु, एनसीबीनं याचिकेवर उत्तर देण्यासाठी मागितला वेळ मागितला होता. या प्रकरणी किमान 2 ते 3 दिवसांचा वेळ देण्याची विनंती सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली आहे. अशातच आर्यन खानच्या जामीनावर बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश एनसीबीला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता आर्यन खानसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर आता थेट बुधवारी सुनावणी घेतली जाणार आहे.