मुंबई : दलित संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान राज्यभरात निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन, शिवसेनेनं सरकारला लक्ष्य केलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून राज्यातील परिस्थितीवर सरकारची भूमिका काय? असा थेट सवाल विचारण्यात आला आहे. तर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचाही अग्रलेखातून समाचार घेतला आहे.


‘प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये.’ अशा शब्दात शिवसेनेनं प्रकाश आंबेडकरांचा समाचार घेतला.

एक नजर 'सामना'च्या अग्रलेखावर :

* राज्यात ठिकठिकाणी उसळलेल्या हिंसाचारात सांडलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंब महाराष्ट्राचा आहे. या सर्व परिस्थितीत आज सरकारची भूमिका नक्की काय आहे? पोलीस खात्याचे राजकारण व गृहखात्याचा भाजप झाल्याचे परिणाम राज्याला भोगावे लागत आहेत. निवडणूक लढवणे आणि सरकार व पोलिसांच्या मदतीने त्या जिंकत राहणे हेच एकमेव सरकारी कार्य बनते तेव्हा राज्यातील ठिणग्यांचा हा असा उद्रेक होतो.

* महाराष्ट्रात जातीय तणाव वाढला तर हे राज्य तोडू पाहणाऱ्यांचे फावेल. महाराष्ट्राचे हित ज्यांना पाहवत नाही त्यांनाच हे जातीय दंगे हवे आहेत, पण राज्याच्या फडणवीस सरकारच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे प्रकार आता रोजच घडू लागले आहेत. हवा बदलत आहे व बुडबुडे फुटत आहेत. भीमा-कोरेगाव दंगलीची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दंगलीनंतर प्रत्येक राज्यकर्ता असे आदेश देतच असतो. त्यात नवे ते काय? पण दंगलखोर प्रवृत्तीचे लोक महाराष्ट्रात पडद्यामागून सूत्रे हलवीत आहेत व बाजूच्या राज्यांतील लोक आमच्या राज्यात येऊन वातावरण बिघडवत आहेत याची कल्पना राज्यकर्त्यांना असायला हवी होती.

* संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान व मिलिंद एकबोटे यांची हिंदू एकता आघाडी यांनी मिळून भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाकडे आलेल्या जमावावर दगडफेक केली, हिंसाचार भडकवला असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये. दंगल भडकवण्यापेक्षा पेटलेल्या जमावास शांत करणारा व दिशा देणारा हाच खरा नेता असतो.

*मृताच्या नातेवाईकांना सरकारने दहा लाखांची मदत केली, पण गेल्या २४ तासांतील दंगलीने सरकारचे कोट्यवधीचे नुकसान झाले. सामान्य लोकांच्या गाड्या, घरांना, दुकानांना आगी लागल्या. त्यांचे नुकसान कोणी भरून द्यायचे?

* सरकारने आता तरी निवडणुकांच्या चक्रव्यूहातून स्वतःला सोडवावे, जमिनीवर यावे. शिवसेनेशी लढायला सारे जीवन आहे. शिवसेनेस राजकारणातून खतम करण्यासाठी शक्ती पणास लावण्यापेक्षा महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढा.

संंबंधित बातम्या :

सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री
दगडफेकीप्रकरणी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेंवर गुन्हा