मुंबई महापालिकेत शिवसेनेचं संख्याबळ 95 वर!
एबीपी माझा वेब टीम | 18 Dec 2018 06:47 PM (IST)
मालाडमधील काँग्रेस नगरसेविकेचं पद रद्द झाल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार गीता भंडारी नगरसेविका झाल्या आहेत.
मुंबई : मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. पालिकेत शिवसेनेचं संख्याबळ एकने वाढून 95 वर पोहचलं आहे. काँग्रेस नगरसेविकेचं पद रद्द झाल्यामुळे शिवसेनेची उमेदवार नगरसेविका झाली आहे. मालाडमधील मालवणी व्हिलेज म्हणजेच प्रभाग क्रमांक 32 च्या काँग्रेस नगरसेविका के. पी. केणी यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवलं आहे. त्यामुळे याच वॉर्ड मधील दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना उमेदवार गीता भंडारी यांना नगरसेवक म्हणून आता महापालिका सभागृहात जाता येणार आहे. हायकोर्टाने दिलेल्या निर्यणाची प्रत महापालिका आयुक्त आणि कोकण विभागीय आयुक्तांना देण्यात आलीय. त्यामुळे आता मुंबई महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांचं संख्याबळ 95 झाली आहे. गेल्यावर्षी पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला चार अपक्षांचा पाठिंबा आहे, तर भाजपला एक अपक्ष आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांचा पाठिंबा आहे. पुढे भांडुप पोटनिवडणुकीतील विजयाने भाजपचं संख्याबळ एकने वाढलं, भाजप डोईजड होण्याच्या शक्यतेने शिवसेनेने शेवटी मनसेचे सहा नगरसेवक आपल्या बाजूला वळवले. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 94 वर पोहोचलं होतं.