कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याण-भिवंडी-ठाणे मार्गाला जोडणाऱ्या मेट्रो 5 आणि मेट्रो 9 च्या मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं. मुंबईच्या विस्तारित भागाला जोडणारा हा फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प मानला जातो. दहिसर-मीरा रोड मेट्रोला वसईपर्यंत नेणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'मुंबईचा विस्तार वाढल्यानंतर मुंबईतला मराठी माणूस ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये विसावला आहे. त्यामुळे भिवंडीसारख्या कुठलीही कनेक्टिव्हिटी नसलेल्या भागाला मेट्रोने जोडत आहोत.' असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित आहेत.

आम्ही केवळ भूमिपूजन करुन थांबणार नाही. मेट्रोचं 60 टक्के काम पूर्ण केलं आहे. मुंबई आणि मेट्रोपोलिटीयन क्षेत्राला अर्बन मोबिलिटी देण्याचं काम करत आहोत. मागच्या 70 वर्षांत जे नेटवर्क उभं राहिलं नाही, ते गेल्या चार वर्षांत उभं केलं आहे. यामध्ये एक कोटी प्रवाशांचा भार सोसला जाणार आहे. मुंबईच्या इतिहासात एवढ्या कमी वेळात इतकं काम कधीच झालं नव्हतं, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

2022 पर्यंत मेट्रोचं 275 किमीचं जाळं, कल्याण मेट्रोच्या भूमिपूजनानंतर मोदींचं आश्वासन


राज्याच्या बजेटमधून कमीत कमी पैसे घेऊन MMRDA चे पैसे वापरुन पायाभूत सुविधांचे काम हाती घेतलं, अशी माहितीही फडणवीसांनी दिली. मुंबईसह पुणे, नाशिक, लातूरमध्येही मेट्रो तयार होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईला मेट्रोने भिवंडीशी जोडणार असून दहिसर-मीरा रोड मेट्रोला वसईपर्यंत नेणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

जल वाहतुकीची सुरुवात झाली आहे. रेल्वे, मेट्रो, मोनो, बस आणि ऑटो ट्रान्सपोर्ट मोड हे सर्व एका तिकीटिंग सिस्टीमवर आणणार आहोत. ही सिस्टिम मोबाईलवर डेस्टिनेशन आणि जवळचं स्थानक दाखवेल. प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किमान एका तासाच्या आत पोहचवण्याचं आमच्या वाहतूक व्यवस्थेचं ध्येय असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याची योजना असल्याचा मानसही फडणवीसांनी बोलून दाखवला. एक लाख 90 हजार घरांची सिडकोची योजना ही देशातील सर्वात मोठी गृहनिर्माण योजना असेल, असा दावाही त्यांनी केला. ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटीचा गृह प्रकल्प असेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.