ठाणे : कोण, कुणाचा, कधी आणि कुठे बदला घेईल याचं काही सांगता येत नाही. कारण ठाण्यामध्ये प्रचाराचा नारळ पत्नीला भिरकावून मारल्याचा प्रकार घडला आहे. ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार माणिक पाटील यांनी पत्नीला प्रचाराचा नारळ भिरकावून मारला. पत्नी संगीता पाटील या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. त्या जखमी झाल्या आहेत.


प्रकरण काय आहे?

ठाण्याच्या श्रीनगर परिसरातील प्रभाग 16 मधील शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी प्रभागातील उमेदवार माणिक पाटील, गुरुमितसिंग स्यान आणि डॉ जितेंद्र वाघ उपस्थित असतानाच शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका संगीता पाटील घटनास्थळी आल्या. इतकी वर्ष कुठे होता असा पती माणिक पाटील यान प्रश्न करताच झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर माणिक पाटील यांनी पत्नी संगीता यांच्यावर प्रचाराचा नारळ भिरकावून जखमी केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. पत्नी संगीता पाटील आणि तिचे समर्थक यांनी श्रीनगर पोलीस ठाणे तक्रारीसाठी धाव घेतली आहे.



ठाण्याच्या श्रीनगर परिसरात प्रभाग-१६ मधून  शिवसेनेने माणिक पाटील याना उमेदवारी दिली. तर विद्यमान नगरसेविका संगीता पाटील याना उमेदवारी देण्यात आली नाही. दरम्यान, माणिक पाटील आणि संगीता पाटील हे पती-पत्नी असून दोघांमध्ये असलेला वाद हा सर्वाना परिचित आहे. त्यांचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.



अनेक परस्परविरोधी तक्रारी यापूर्वी अनेकवेळा करण्यात आल्या आहेत. दरम्यान रविवारी माणिक पाटील यांनी प्रचाराचा भिरकाविल्याने संगीता पाटील यांच्या डोक्याला मार लागला. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली असून प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान पती-पत्नीचा वाद हा विकोपाला गेला असून संगीता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पती माणिक पाटील अनेक धमक्या आणि धामिकचे संदेश देण्याचे प्रकार केल्याचे संगीता पाटील यांनी सांगितले.