मुंबई : युतीसंदर्भात वेगवेगळे फॉर्म्युले समोर येत असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. युतीचा फॉर्म्युला लोकसभेवेळीच ठरलाय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करुन दिलीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तसंच 135-135 हा फॉर्म्युला केवळ मीडियाने पसरवला आहे. दोन दिवसांत युतीचा फॉर्म्युला जाहीर करु, असं देखील उद्धव ठाकेरंनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "गेले काही दिवस युती हा विषय गाजताय. लोकसभा निवडणुकीआधी आम्हा तिघांमध्ये युतीचा फॉर्म्युला ठरला होता. यावेळी वेगळी पद्धत अवलंबली आहे. दोन दिवसात सगळं काही समजेल."
पाच वर्षात सरकारला दगा दिला नाही : उद्धव ठाकरे
भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमातील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात बहुमत नसतानाही स्थिर सरकार चालवून दाखवलं, असं विधान नरेंद्र मोदींन केलं होतं. याविषयी उद्धव ठाकरे म्हणाले की, "बहुमताचं सरकार नव्हतं, पण आम्ही पाच वर्षात सरकारला कधीच दगा दिला नाही. राजीनामे कुठं गेले, असा विचारलं जातं होतं, तेवढं सोडलं तर शिवसेना सरकारसोबत आहे."