शिवसेना-भाजप युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत. वधू आणि वरपक्षाकडून अखेरच्या वाटाघाटी सुरु आहेत. भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार युतीचा विवाह निश्चित मानला जात आहे.
गेल्या वेळी म्हणजेच 2014 मधील लोकसभेच्या निवडणुकांत 48 जागांपैकी भाजपने 26 तर, शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. यावेळी भाजप लोकसभेची एक ज्यादा जागा शिवसेनेला द्यायला तयार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला 25-23 असा असण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून भिवंडी किंवा पालघर या जागेवर दावा सांगितला जात आहे. खरं तर ही जागा द्यायला भाजप तयार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. या दोन जागांच्या ऐवजी दुसरी एखादी जागा शिवसेनेला सोडून युतीवर लवकरच शिक्कामोर्तब होईल, अशी भाजपमधील सूत्रांची माहिती आहे.
युतीचं स्टेटस काय?
कधी शिवसेनेकडून स्वबळाची भाषा होते, तर कधी संजय राऊत 'मोठा भाऊ किंवा वडील' अशा बदलत्या भूमिकेत जात युतीचे संकेत देतात. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीसांनीही 'भाजप लाचार नाही, पण युतीला तयार आहे' असं म्हणत हात पुढे केला आहे.
खरं तर युती व्हावी आणि होऊ नये असे दोन गट शिवसेनेत आहे. युतीच्या बाजूने एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई
आणि अनिल देसाई आहेत. तर युतीच्या विरोधात संजय राऊत, दिवाकर रावते आणि रामदास कदम आहेत. अर्थात निर्णय उद्धव ठाकरेच घेणार आहेत. पण या दोन मतप्रवाहांमुळेच युतीची चर्चा अडल्याचं कळतंय.