ठाणे : रविवारचा दिवस हा मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी 'घात'वार ठरला. अवघ्या सात तासात झालेल्या विविध अपघातांमध्ये सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे-डोंबिवली-ऐरोली मार्गावर सकाळच्या वेळेत हे अपघात घडले.
ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या व्यक्तीचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला. सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडलेला हा पहिला अपघात होता.
आठ वाजताच्या सुमारास 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह ठाणे आणि ऐरोली स्थानकादरम्यान आढळला. लोकलच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
या घटनास्थळापासून काही मीटर अंतरावरच नऊ वाजताच्या सुमारास 20 वर्षीय राहुल चौहानचा मृतदेह आढळला. रुळावरुन ठाणे स्टेशनकडे चालत जाताना त्याला ट्रेनने उडवलं. विटाव्यात राहणारा राहुल दोनच दिवसांपूर्वी नाशिकहून आला होता. नोकरीचा त्याचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला.
घाटकोपरहून ठाणेमार्गे नालासोपाऱ्याला जाणाऱ्या 44 वर्षीय अकेश पडयाल यांचाही मृत्यू झाला. ठाणे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर फलाट आणि रुळाच्या मध्ये त्यांचा मृतदेह सापडला. धावती लोकल पकडण्याच्या नादात त्यांना प्राण गमवावे लागल्याची शक्यता आहे.
कोपरमध्ये 26 वर्षीय प्रिती राणे, त्यांचा दोन वर्षांचा मुलगा लिवेश आणि नातेवाईक सुनिता बांगले यांचाही मृत्यू झाला. रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेस ट्रेन आणि लोकल यांच्या मधोमध अडकल्यामुळे त्या जखमी झाल्या होत्या.
मध्य रेल्वेवर 'घात'वार, सात तासात सात प्रवाशांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Feb 2019 10:59 AM (IST)
मध्य रेल्वेवर रविवारी अवघ्या सात तासात झालेल्या विविध अपघातांमध्ये सात प्रवाशांचा मृत्यू झाले. ठाणे-डोंबिवली-ऐरोली मार्गावर सकाळच्या वेळेत हे अपघात घडले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -