मुंबई : भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा आणि मुंबईतील भाजप खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामासोबत केली आहे. विरोधकांची महाआघाडी म्हणजे महा'ठग'बंधन असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

मुंबईत सोमय्या मैदानावर आयोजित भाजयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण सभारंभात पूनम महाजन यांनी हे टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवार हे रामायणातील मंथरा, तर महाभारतातील शकुनी मामा आहेत. सगळ्यांचं ऐकल्याचं दाखवून शकुनी मामासारखे नाक खुपसून सगळीकडे महाभारत सुरु करणारे शरद पवारही या महाआघाडीत आहेत. स्वत:ला मिळालं नाही, की इकडचं तिकडे, तिकडचं इकडे करणाऱ्या मंथरा आणि शकुनीसारखी पवारांची अवस्था आहे. असे हे सगळे मिळून मोदींच्या विकासरथाला अडवू पाहत आहेत. परंतु महाआघाडीच्या दलदलीत भाजपचं कमळच उमलेल असा विश्वास पूनम महाजन यांनी व्यक्त केला.



फक्त आपल्या आईचं ऐकणारे आणि राफेल-राफेल करणारे राहुल गांधी हे 'राफूल' आहेत. तर प्रियांका गांधी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती म्हणजे 'बेटी लाओ और बेटा बचाओ' कार्यक्रम आहे, असंही पूनम महाजन म्हणाल्या. काँग्रेसने प्रियांकांचे इतके फोटो पसरवले, की ती तैमूर अली असल्यासारखंच वाटत होतं, असंही महाजन म्हणाल्या.

ममता बॅनर्जी म्हणजे 'टेरर मेकिंग दादा' आहेत. त्यांचं कामच अमानुष आहे. अशीच अवस्था अखिलेश यादव, बसपच्या मायावती यांची आहे. रोज कुत्र्या-मांजरांसारखं एकमेकांशी भांडणारे आता मोदी नावाच्या सूर्याला रोखण्यासाठी महाआघाडी करत आहेत. ही महाआघाडी म्हणजे 'महाठगबंधन' आहे, अशा शब्दांत पूनम महाजन यांनी विरोधकांच्या महाआघाडीचा समाचार घेतला.

यापूर्वीही, प्रभू रामचंद्र हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय होते, उत्तर भारतीयांमुळेच मुंबईचा विकास झाला, अशी वक्तव्यं पूनम महाजन यांनी केली होती.