एकीकडे भाजपचे नेते शिवसेनेवर आरोप करत आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री युतीची भाषा करत आहेत. हा भाजप नेत्यांचा दुटप्पीपणा आहे. भाजपच्या नेत्यांनी बेताल वक्तव्यं थांबवावी असा इशारा अनिल परब यांनी दिला.
आमची नाराजी आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे व्यक्त केली आहे. पक्षप्रमुखांवर आरोप होत असतील तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असं परब म्हणाले.
आता युती तोडण्याचं पाप कुणी करु नये: अनिल परब
एका बाजूला मुख्यमंत्री युतीसाठी आग्रही आहेत. दुसरीकडे त्यांचे नेते आरोप करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. नेते आरोप करत असतील तर मुख्यमंत्र्यांचं त्यांना समर्थन आहे का, नसेल तर त्यांना आवर का घालत नाहीत, असे प्रश्न आहेत, असं परब यांनी नमूद केलं.
शिवसेनेने 'सामना'तून भाजपच्या कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक टीका केली नाही. गेल्या दोन वर्षात भाजपच्या 13 जणांवर विविध आरोप झाले. युतीच्या चर्चेसाठी येत असलेल्या विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि आशिष शेलार यांच्यावरही आरोप आहेत. त्यामुळे जर आम्हाला पारदर्शकतेची सुरुवात करायची असती, तर तिथून केली असती, असा पलटवार अनिल परब यांनी केला.
आमची संयमाची भूमिका आहे, मात्र भाजप नेत्यांनीही संयम पाळावा. आम्ही आमचं म्हणणं मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. आता निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे, असं म्हणत अनिल परब यांनी चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला आहे.
संबंधित बातम्या