मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेल्या शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे आपल्या मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधला. मंत्रिमंडळाचा विस्तार बदल्या-बढत्यांचा उत्सव असून त्यावर फार चर्चा न केलेली बरी असा खोचक टोला लगावला आहे.


देशाला अनेक प्रश्न भेडसावात असताना कोणत्या मंत्रालयानं नक्की कोणते प्रश्न सोडवले असा सवालही 'सामना'तून उपस्थित करण्यात आला आहे.

“निवडणुका जिंकणे व सरकारे बनवणे हाच सध्या राजकीय, पण राष्ट्रीय खेळ झाला आहे. त्यामुळे सरकारी पटावरील प्यादीही त्याच पद्धतीने बसवली व चालवली जातात.”, असे म्हणत शिवसेनेने ‘सामना’तून पंतप्रधान मोदींसह भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने केंद्र सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त करत घरचा आहेर दिला आहे. ‘सामाना’त म्हटलंय की, “केंद्रात मोदी सरकार स्थानापन्न होऊन आता तीन वर्षे झाली आहेत. मात्र तीन वर्षांनंतरही मंत्रिमंडळात प्रयोग सुरू आहेत. अच्छे दिनाचा चमत्कार होण्याच्या प्रतीक्षेत देश आहे.”

दरम्यान, शिवसेनेने ‘सामना’तून टीका केल्यानंतर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.