मुंबई: शिवसेनेने पुन्हा एकदा मुखपत्र ‘सामना’तून भाजपवर हल्ला चढवला. शिवसेनेने यावेळी उत्तर प्रदेशातील गोरखपूर पोटनिवडणुकीतील पराभवावरुन भाजपवर निशाणा साधला.
गोरखपूर पोटनिवडणुकीने अहंकार आणि उन्मत्तपणाचा पराभव केला. मित्रांना दूर लोटलं आणि खोट्याचा मार्ग स्वीकारला की नशिबी पराभवाचे गोटेच येतात, असं ‘सामना’त म्हटलं आहे.
जनतेने उचलून आपटले हे मान्यच करावं लागेल, असा टोला भाजपला लगावला आहे.
‘सामना’त काय म्हटलंय?
गोरखपूर व फुलपूर हे भाजपचे दोन मजबूत किल्ले समाजवादी पार्टीने उद्ध्वस्त केले आहेत. पोटनिवडणुका म्हणजे देशाची भावना नाही असे भाजपतर्फे सांगितले जाते; पण मोदी हे सत्तेवर आल्यापासून १० लोकसभा पोटनिवडणुका झाल्या व त्यातील ९ जागांवर भाजपचा पराभव झाला. लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे २८२ खासदार होते. हा आकडा आता २७२ पर्यंत घसरला आहे.
भाजप मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ सर्व पोटनिवडणुका हरला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान व आता उत्तर प्रदेश या राज्यांत भारतीय जनता पक्षाचीच सरकारे आहेत. मोदी हे प्रचंड लोकप्रिय असतानाही किल्ले का ढासळले? २०१४ साली मोदी लोकप्रियतेची प्रचंड लाट उसळून जनतेच्या नाकातोंडात पाणी गेले व त्या लाटेत अनेक ओंडकेही विजयाच्या किनाऱ्यावर लागले; पण नाकातोंडातले व डोळ्यातले पाणी आता निघून गेले व लोकांना स्वच्छ दिसू लागले असे समजायचे काय?
संबंधित बातम्या
कोणत्या राज्यात काय परिस्थिती? राज्यसभेचं संपूर्ण गणित