Election 2022 : शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्यातल्या सत्तेत एकत्र असले तरी ठाण्यात मात्र आगामी आघाडीसाठी सुरुंग लागलेला पाहायला मिळत आहे, ठाण्यात भविष्यात एकत्र निवडणूका लढण्यावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद सुरु झाले आहेत. पण दुसरीकडे गोव्यासोबत मुंबई आणि इतर महापालिका निवडणुकीत मात्र शिवसेना राष्ट्रावादीचं जुळण्याची शक्यता आहे. 


शिवसेना आणि राष्ट्रवादी कसे एकत्र येणार?


मुंबई महापालिकेत एकूण 236 वॉर्ड आहेत. यामध्ये सत्तेत येण्यासाठी 114 ची गरज आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेनेची  मुंबई महापालिकेत सत्ता येण्यासाठी राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक लढण्याची चर्चा आहे. यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी एकत्र आले तर शिवसेना 180 ते 190 जागांवर निवडणुका लढवणार तर राष्ट्रवादी 40 ते 50 जागांवर मुंबई महापालिकेत निवडणुक लढवेल. यातून शिवसेनेचे सद्यस्थितीत असणारे 97 नगरसेवक निवडून आले आहेत आणि सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक आहेत .म्हणजे दोन्ही मिळून 105 संख्या सद्यस्थितीत आहे.तर आगामी महापालिका निवडणुकीत आणखी जोर लावून आपले काही नगरसेवक आणखी निवडून आणि इतर नगरसेवक आपल्या सोबत घेऊन महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकत्रित सत्ता येऊ शकते. राष्ट्रवादीची मुंबईत फारशी ताकद नाहीय त्यामुळे मागच्या वेळी दुस-या आणि तिस-या क्रमाकांवर पडलेली मत आणि सध्याची उमेदवारीची स्थिती याचा आढावा घेण्याचं काम सुरु आहे. अमराठी भाषिक वॅार्डांमध्ये राष्ट्रवादीला जागा देण्यावर सेनेचा भर असेल. ज्या भागात भाजपची ताकद जास्त आहे त्या वॅार्डात दोन्ही पक्षाचा ताकदीनं लढण्याचा विचार सुरु आहे. भाषिक रचनेनं शिवसेना आणि राष्ट्रवादीत जास्तीत जास्त उमेदवारी ठरवली जाईल.  


कोणत्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होणार?


मुंबई महापालिकेत भाजपचं संख्याबळ कमी करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येतील जसं राज्यात भाजपला दोन्ही पक्षांनी दूर ठेवलं तसंच मुंबईतही भाजपला डोकं वर काढू न देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्यात जसे प्रादेशिक पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन केली त्याचप्रमाणे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रादेशिक पक्ष गोव्यात देखील आगामी निवडणुकीत विविध मुद्द्यांवर एकत्र आले आहेत. त्याचप्रमाणे यंदा आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला कोणाच्या तरी मदतीशिवाय सत्ता स्थापन करणं अवघड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन लढणार आहे. मुंबई महापालिका ही गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेच्या हाती आहे  यामध्ये गेल्याच निवडणुकांमध्ये, ही महापालिका शिवसेनेच्या हातून जाता जाता वाचली आहे . त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन लढण्यास मुस्लिम बहुल भागामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच राष्ट्रवादी युवक कांग्रेस यांचा मुंबईत मुंबई उपनगर आणि शहर या काही भागात चांगला प्रभाव आहे .तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी जर एकत्र आली तर विविध विकासाच्या आणि राजकीय मुद्द्यांवर देखील स्थानिक पातळीवर भाजप तसेच इतर मित्रपक्षांना शह देता येईल यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार आहे अशी माहिती मिळत आहे आणि ते शक्य आहे असा देखील राजकीय जाणकार सांगतात.


राष्ट्रवादी आणि शिवसेना युती गोव्या बरोबरच, नवी मुंबईतही….


शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी गोवा विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आज किंवा उद्या या दोघांमध्ये जागावाटपाबाबत निर्णय होणार आहे प्रथमच दोन प्रादेशिक पक्ष एकत्र येत गोव्याच्या या राजकारणात ते लढणार आहेत महाराष्ट्र राज्यात सत्तास्थापनेसाठी जो फॉर्म्युला वापरला आणि ज्या मुद्द्यांवर एकत्र आले त्याच मुद्द्यांवर गोव्यात देखील निवडणूक लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


तसेच आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस  एकत्र लढण्याचे ठरलेले आहे. त्यामुळे आम्ही एकत्र काढून ही महापालिका जिंकू असा विश्वास अल्पसंख्यांक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला. नवी मुंबई महापालिका निवडणुका मागील काही महिन्यांपासून लांबणीवर पडल्या आहेत. राष्ट्रवादीचे माजी नेते गणेश नाईक यांनी मागील दोन वर्षांपासून भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने या निवडणुका भाजप विरोधात थेट राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र येऊन लढणार आहेत, त्यासंदर्भात मलिक यांच्याशी विचारले असता त्यांनी आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढलो तर नवी मुंबई महापालिका जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता .


ठाण्यात दोघांमध्ये खटका


राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी असली. तरी स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षांमध्ये खटके उडाल्याचं या आधीही पाहायला मिळालंय. आता पुन्हा ठाण्यात तशीच झलक पाहायला मिळाली. उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात श्रेयवादावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यानंतर अनेक प्रकरणे या ठिकाणी घडली यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना हे आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र लढणार नसल्याचं चित्र आहे.


मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल 


शिवसेना – 97
भाजप – 83
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी – 8
समाजवादी पक्ष – 6
मनसे – 1
एमआयएम – 2
अभासे – 1


एकूण – 227


बहुमताचा आकडा – 114


मुंबई महापालिकेत सत्तेत येण्यासाठी बहुमताचा आकडा 114 चा आहे. आता शिवसेनेचे 97 नगरसेवक सद्यस्थितीला आहेत .तर आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी यांच्याबरोबर एकत्रित येऊन निवडणूक लढली तर बहुमताचा आकडा गाठणे शिवसेनेला सोपे पडणार आहे. तसेच राष्ट्रवादीला देखील महापालिकेत सत्तेत येण्याचा हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे दोघांचा मनोमिलन होण्याची दाट चिन्ह आहेत.


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha