घाटकोपर : आतापर्यंत आपण सोन्या-चांदीचे दागिने, पैसे, घरातल्या महागड्या वस्तू तसंच वाहनं चोरी झाल्याचे ऐकत होतो. पण आता मुंबईतील उपनगर घाटकोपर मध्ये तर चक्क दोन शौचालयं एका रात्रीत चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील देण्यात आली असून स्थानिक नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याविरुद्ध आंदोलन देखील केले आहे.


घाटकोपर पश्चिमेला रेल्वे स्टेशन परिसरात असलेली दोन शौचालयं एका रात्रीत जेसीबी मशीनद्वारे पालिकेला किंवा स्थानिकांना न कळवता अज्ञातांकडून हटवण्यात आली. ज्यानंतर सकाळी जेव्हा या ठिकाणी स्थानिक नागरिक शौचालयाचा वापर करण्यासाठी गेले, तेव्हा त्याठिकाणी टॉयलेट नव्हते. त्यामुळे स्थानिकांनी लगेचच या प्रकरणाची पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.


राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन


या सर्व प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी याविरुद्ध आंदोलन देखील केलं. त्यांनी चोरीला गेलेले शौचालय लवकरात लवकर प्रशासनाने शोधून द्यावे आणि ज्यांनी चोरी केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. या प्रकरणी पालिका आणि पोलीस यांना देखील काहीच माहीत नसल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे असे कोणी का केले आहे आणि यामागे  नेमका कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha