मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी देवाला देखील सोडलेलं दिसत नाही. कुणी गणेशभक्तांना साकडं घालत आहे, तर कुणी साईभक्तांना आपलसं करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आता कोणता देव कोणत्या पक्षाला पावणार हे तर महापालिका निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी उत्तर भारतीयांना गोंजारल्याचं तुम्हाला आठवत असेल. आता त्याच भाजपनं आपला मोर्चा साईभक्तांकडे वळवला आहे. कारण मुंबईतल्या 70 टक्के गणेश मंडळांवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. त्याला शह देण्यासाठी भाजपनं ही खेळी केली आहे.
त्यासाठी साईसेवा मंडळांची शिवाजी मंदिरात बैठकही बोलावली. मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात साईभक्तांची संख्या मोठी आहे. यावर डोळा ठेवून भाजपनं पाऊल टाकलं आहे. मग शिवसेना तरी कशी मागे राहणार?
भाजप आणि शिवसेनेनं देवांच्या मंडळाचं राजकारण करण्यापेक्षा मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यावं असा सल्ला मनसेनं दिला आहे. दहीहंडी, गणेश उत्सव किंवा आता साई मंडळातून पक्षांना कार्यकर्ते मिळतात आणि त्यांच्याच जीवावर निवडणुका जिंकण्याचा राजकीय पक्षांचा मनसुबा असतो. मुंबईत शिवसेना आणि भाजपची युती होईल की नाही हे माहित नाही. पण सध्या हे दोन्ही पक्ष आपापले गड मजबूत करत आहेत. पण राजकीय पक्षांच्या या प्रयत्नांना साईबाबा पावणार का हे पाहणं महत्वाचं आहे.